शरणापूर येथे पाच लाख रुपये ताब्यात
By Admin | Updated: September 22, 2014 01:11 IST2014-09-22T00:13:13+5:302014-09-22T01:11:22+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघांतर्गत भरारी पथकाने शनिवारी मध्यरात्री ट्रॅक्स जीपमधून पाच लाख रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली.

शरणापूर येथे पाच लाख रुपये ताब्यात
औरंगाबाद : औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघांतर्गत भरारी पथकाने शनिवारी मध्यरात्री ट्रॅक्स जीपमधून पाच लाख रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली. पुढील तपासासाठी ही रक्कम दौलताबाद पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रिता मेत्रेवार यांनी सांगितले. शहरातील तिन्ही मतदारसंघांच्या हद्दीतील भरारी पथकांची ही पहिली कारवाई आहे.
शरणापूरजवळ शनिवारी मध्यरात्री निवडणूक विभागाचे भरारी पथक वाहनांची तपासणी करीत होते. तेव्हा शेख ताहेर, मच्ंिछद्र अतकरे, सीताराम ठापसे, असद खान, मोहम्मद शकील आणि मोहम्मद शाकेर हे सहा जण ट्रॅक्समधून तेथून जात होते. पथकाने गाडी थांबवून तपासणी केली असता ड्रायव्हरच्या सीटजवळ ४ लाख ९७ हजार रुपयांची रक्कम आढळून आली.
पथकप्रमुख एल. आर. देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वरील सहा जणांकडे या रकमेविषयी विचारणा केली तेव्हा त्यांनी आपण व्यापारी असून, ही रक्कम व्यवसायाची आहे, असे सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची मागणी केली. मात्र, ते कागदपत्र दाखवू शकले नाहीत. त्यामुळे ही रक्कम कदाचित निवडणुकीत वापरण्यासाठी नेली जात असावी, असा संशय पथकातील सदस्यांना आला. पथकप्रमुख देशपांडे यांनी लगेच निवडणूक निर्णय अधिकारी रिता मेत्रेवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ही रक्कम पुढील तपासासाठी पोलिसांकडे जमा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार भरारी पथकाने ४ लाख ९७ हजार रुपयांची रक्कम दौलताबाद पोलीस ठाण्यात जमा केली. भरारी पथकात पी. एस. गोरे, ए. के. बनकर, के. व्ही. बनकर, के. व्ही. पाटील यांचा समावेश होता.