निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच निष्पाप मुस्लिम तरुणांचे अटकसत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:07 IST2019-01-28T00:07:12+5:302019-01-28T00:07:30+5:30
आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निष्पाप मुस्लिम तरुणांना देशद्रोही ठरविण्यात येत आहे. मुंबई आणि औैरंगाबाद एटीएस पोलिसांनी आतापर्यंत ज्या तरुणांना इसिसशी संबंधित असल्याचा ठपका ठेवून अटक दाखविण्यात आली त्या तरुणांकडून कोणतेही वादग्रस्त साहित्य जप्त केलेले नाही.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच निष्पाप मुस्लिम तरुणांचे अटकसत्र
औरंगाबाद : आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निष्पाप मुस्लिम तरुणांना देशद्रोही ठरविण्यात येत आहे. मुंबई आणि औैरंगाबाद एटीएस पोलिसांनी आतापर्यंत ज्या तरुणांना इसिसशी संबंधित असल्याचा ठपका ठेवून अटक दाखविण्यात आली त्या तरुणांकडून कोणतेही वादग्रस्त साहित्य जप्त केलेले नाही. प्रत्येक घरात जे साहित्य सहज उपलब्ध असते तेच साहित्य या तरुणांच्याही घरी होते. मुस्लिम तरुण इसिसकडे आकर्षित होऊ नये असे सरकारला खरोखरच वाटत असेल, तर त्या वेबसाईट बंद कराव्यात, अशी मागणी मुस्लिम नुमार्इंदा कौन्सिलने एका बैठकीत केली.
मुंबई आणि औैरंगाबाद एटीएसने केलेल्या कारवाईनंतर कौन्सिलची तातडीची एक बैठक घेण्यात आली. बैठकीत उपस्थित मान्यवरांनी आपल्या तीव्र भावना यावेळी व्यक्त केल्या. मुशाहेद-उल-इस्लाम (तारेख) या तरुणाची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तो व्यवसायाने ग्राफिक्स डिझायनर आहे. औरंगाबादेत ज्या तरुणांना अटक केली त्यांच्याकडून पोलिसांनी काय जप्त केले...? तर उंदीर मारण्याचे पावडर, थिनर, टॉयलेट क्लिनर, लॅपटॉप, सेलफोन, हार्डडिस्क आदींचा समावेश आहे. या साहित्यापासून ते केमिकल हल्ला करणार होते, असे सांगण्यात आले. पोलिसांनी जप्त केलेले साहित्य प्रत्येक नागरिकाच्या घरात सहजपणे उपलब्ध असते. या साहित्यामुळे तरुणांना थेट इसिसशी कसा काय संबंध जोडला जाऊ शकतो, मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचा हा सरकारचा डाव आहे. मुस्लिम समाजात दहशत पसरावी हा त्यामागचा हेतू आहे. डोंबिवलीमध्ये भाजपचा कार्यकर्ता कुलकर्णी याला मोठ्या शस्त्रसाठ्यासह पकडण्यात आले. त्याच्यावर सरकारने कोणती कारवाई केली? असा प्रश्नही बैैठकीत उपस्थित करण्यात आला.
कौन्सिलने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, एखाद्या वेबसाईटवर सर्चिंग करणे गुन्हा नाही. सरकारला खरोखरच मुस्लिम समाजाबद्दल आपुलकी असेल तर इसिसच्या सर्व वेबसाईटवर बंदी घातली पाहिजे, जेणेकरून तरुण तिकडे भरकटणारच नाहीत.