देवगिरी किल्ल्यावर भीषण आगीनंतर पुरातत्त्व विभागाला जाग; सर्वेक्षणानंतर करणार उपाययोजना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 16:10 IST2025-04-10T16:10:21+5:302025-04-10T16:10:43+5:30
देवगिरी किल्ल्यावर गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार आगीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, मंगळवारी लागलेल्या आगीची तीव्रता व व्याप्ती अधिक होती.

देवगिरी किल्ल्यावर भीषण आगीनंतर पुरातत्त्व विभागाला जाग; सर्वेक्षणानंतर करणार उपाययोजना
छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक देवगिरी (दौलताबाद) किल्ल्यावरील झाडाझुडपांना मंगळवारी लागलेल्या भीषण आगीच्या घटनेने अखेर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणला जाग आली आहे. या किल्ल्यावर आगीच्या घटना कायमच्या रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, यादृष्टीने बुधवारी सर्वेक्षण करण्यात आले.
देवगिरी किल्ल्यावर गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार आगीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, मंगळवारी लागलेल्या आगीची तीव्रता व व्याप्ती अधिक होती. या भीषण घटनेने ऐतिहासिक किल्ला धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. या घटनेमुळे यंत्रणेच्या कारभाराविषयी सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. किल्ल्यावर ३० अग्निशमन सिलिंडर असल्याचा दावा भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणकडून करण्यात येतो, परंतु मंगळवारच्या घटनेनंतर आगीवर ताबडतोब नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी पाऊल टाकण्यात आले. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे संरक्षण सहायक संजय रोहणकर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी किल्ल्यावर सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणातून पाण्याच्या टाक्या, अग्निशमन यंत्रणेसह आवश्यक बाबींवर प्राधान्याने काम करण्यात येणार आहे.
सर्वत्र काळी राख
आगीच्या घटनेने किल्ल्याच्या परिसरात सर्वत्र काळी राख पाहायला मिळत आहे. ही स्थिती पाहून पर्यटक, इतिहास प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या गोष्टींचा विचार आवश्यक
- भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणने विशेष सुरक्षा आराखडा तयार करावा.
- उन्हाळ्यात कोरडे गवत सहज पेट घेते. त्यामुळे किल्ल्याच्या आसपासच्या भागात नियमितपणे गवत-कचरा काढणे आवश्यक.
- गवत, कचऱ्यापासून ‘सेंद्रिय खत निर्मिती’ होऊ शकते, याची चाचपणी करावी.
- कायमस्वरूपी आग प्रतिबंधक पथकाची स्थापना करावी.
- उन्हाळ्यात पर्यटन हंगामात, विशेषतः एप्रिल ते जूनदरम्यान स्थायी अग्निशमन पथक तैनात करावे.
- सीसीटीव्ही वॉच टॉवर्समधून देखरेख ठेवणे.
- किल्ल्यावर धूम्रपान, प्लॅस्टिक वा इतर वस्तू जाळणे, अशा गोष्टींवर सक्तीने बंदी. प्रवेशद्वारावर हवी तपासणी.
- दोषी आढळल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद करणे.
- स्वयंसेवी संस्था, ट्रेकिंग ग्रुप यांना ‘फायर वॉच वॉलंटियर्स’ म्हणून प्रशिक्षित करता येईल.
- नागरिकांत जनजागृती मोहिमा राबवता येतील.
- अग्निशमन विभागाशी समन्वय.
- जवळच्या फायर स्टेशनमध्ये विशेष युनिट तयार करणे.
- किल्ल्याच्या पायथ्याशी व ठिकठिकाणी पाण्याची टाकी व पोर्टेबल फायर एक्सटिंग्विशर्स ठेवल्यास आग नियंत्रणात आणता येते.