अपात्रांना २० लाख रुपयांत सरकारी ‘स्टाफ नर्स’चे नियुक्तीपत्र; गैरप्रकारात धुळे-वांद्रे कनेक्शन

By संतोष हिरेमठ | Updated: June 2, 2025 12:37 IST2025-06-02T12:36:44+5:302025-06-02T12:37:02+5:30

राज्यात २०१८ पासून गैरप्रकार; ‘स्टाफ नर्स’ भरती प्रक्रियेत काही उमेदवारांना हेरून पात्र नसणाऱ्यांचे डाक्युमेंट व्हेरीफिकेशन करून नियुक्ती देण्याचे आमिष दाखवले जाते. यासाठी १५ ते २० लाख रुपये घेण्याचा ‘उद्योग’ काही जण करीत असल्याचे समजते.

Appointment letter of government 'staff nurse' for Rs 20 lakh to ineligible persons; Dhule-Bandra connection in malpractice | अपात्रांना २० लाख रुपयांत सरकारी ‘स्टाफ नर्स’चे नियुक्तीपत्र; गैरप्रकारात धुळे-वांद्रे कनेक्शन

अपात्रांना २० लाख रुपयांत सरकारी ‘स्टाफ नर्स’चे नियुक्तीपत्र; गैरप्रकारात धुळे-वांद्रे कनेक्शन

छत्रपती संभाजीनगर : ‘२० लाख रुपये मोजा आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत स्टाफ नर्स म्हणून नियुक्ती मिळवा’, असा उद्योग काहींनी सुरू केला आहे. राज्यात २०१८ पासून हा गैरप्रकार सुरू असल्याचे समजते. छत्रपती संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) अपात्र उमेदवार वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाचे नियुक्तीपत्र घेऊन आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांच्या अधिनस्थ संस्थांमधील अधिपरिचारिका (गट-क) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी २०२३ मध्ये परीक्षा घेण्यात आली. परीक्षेनंतर २०२४ मध्ये गुणवत्ताधारक आणि पात्रताधारक उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. या सगळ्यात २५ मार्च २०२५ रोजीचे नियुक्तीपत्र घेऊन एक उमेदवार घाटी रुग्णालयात रूजू होण्यासाठी २७ मे रोजी दाखल झाला. परंतु, इतक्या उशिराने नियुक्ती आल्याने घाटीतील कर्मचाऱ्याला शंका आली. कर्मचाऱ्याने उमेदवाराला अधिक विचारपूस केली, तेव्हा उमेदवार आणि त्याच्यासोबत असलेल्या महिला तत्काळ रूजू करून घेण्याचा आग्रह करीत होत्या. पात्रताधारकांच्या यादीत नावच नसल्याने हा उमेदवार अपात्र असल्याचे लक्षात आल्यानंतर कर्मचाऱ्याने आणखी विचारपूस करण्यास सुरुवात करताच उमेदवाराने घाटीतून काढता पाय घेतला.

चौकशी झाली, तर गोंधळ चव्हाट्यावर येईल
‘स्टाफ नर्स’ भरती प्रक्रियेत काही उमेदवारांना हेरून पात्र नसणाऱ्यांचे डाक्युमेंट व्हेरीफिकेशन करून नियुक्ती देण्याचे आमिष दाखवले जाते. यासाठी १५ ते २० लाख रुपये घेण्याचा ‘उद्योग’ काही जण करीत असल्याचे समजते. नियुक्ती होईपर्यंत टप्प्याटप्प्याने ही रक्कम घेण्यात येते. २०१८ पासून अनेकांकडून पैसे घेऊन नियुक्ती देण्यात आली आहे. २०१८ पासून रूजू झालेल्या ‘स्टाफ नर्स’ कर्मचाऱ्यांच्या पात्रतेची चौकशी केल्यास अनेक अपात्र नियुक्त झाल्याचे समोर येऊ शकते.

धुळ्याहून कारभार
नियुक्तीचा उद्योग करणारे काही जण धुळे येथे कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. यातील एक जण हा वांद्रे येथील आरोग्य संस्थेत कार्यरत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही या साखळीतील एक व्यक्ती आहे.

...मग म्हणायचे नियुक्तीपत्र बनावट
पैसे घेऊन ‘स्टाफ नर्स’साठी नियुक्तीपत्र दिले जाते. शेवटच्या टप्प्यात उमेदवाराला संस्थेत रूजू होण्यास पाठविले जाते. अशावेळी उमेदवार रूजू होण्याची शक्यता वाढते. प्रसंगी मुंबईतही फोन केला जातो, परंतु कोणी शंका उपस्थित केलीच, तर उमेदवाराने बनावट नियुक्तीपत्र आणल्याचे सांगितले जाते. यात उमेदवारच अडचणीत सापडतो. गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने उमेदवार पैसे गमावूनही गप्प बसतात. काही उमेदवार पैसे परत देण्याचा तगादा हा ‘उद्योग’ चालविणाऱ्यांकडे लावत आहे.

नवीन भरती प्रक्रिया
असा काही प्रकार झालेला असेल, तर छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता गुन्हा दाखल करतील. पूर्वीची भरती प्रक्रिया संपलेली आहे. आता नवीन भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
- राजीव निवतकर, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण आणि आयुष

Web Title: Appointment letter of government 'staff nurse' for Rs 20 lakh to ineligible persons; Dhule-Bandra connection in malpractice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.