खुशाल एसआयटी नियुक्त करा, पण निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे; मनोज जरांगेंची मागणी
By बापू सोळुंके | Updated: February 27, 2024 14:03 IST2024-02-27T14:02:15+5:302024-02-27T14:03:23+5:30
मी कोणत्याही राजकीय पक्ष अथवा नेत्यांच्या विरोधात आणि जवळचा नाही.

खुशाल एसआयटी नियुक्त करा, पण निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे; मनोज जरांगेंची मागणी
छत्रपती संभाजीनगर : अंतरवाली सराटी येथे झालेल्या पोलिसांवरील दगडफेकींच्या घटनेची एसआयटीमार्फत खुशाल चौकशी करा. पण ही चौकशी निपक्षपातीपणे करा आणि होऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी अशी मागणी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली .
उपोषणामुळे प्रकृती खालावल्याने जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरमधील खाजगी रुग्णालयात सोमवारी रात्रीपासून उपचार घेत आहेत. आज सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले, शांततेच्या मार्गाने उपोषण करणाऱ्या महिला आणि अबाल वृद्धांवर लाठीहल्ला आणि गोळीबार करणाऱ्या पोलिसांची ही चौकशी करावी अशी आमची मागणी केली. आपल्याला अडकवण्यासाठी षडयंत्र रचल्या जात असल्याचे तीन दिवसांपूर्वीच अंतरवाली सराटी येथे समाजबांधवांना सांगितले होते. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवावर गुन्हे दाखल केले जात आहे हा. हे सरकार आता सत्तेचा दुरुपयोग करीत असता आरोप जरांगे पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला.
मंत्र्यांची देखील चौकशी करा
लाठीहल्ल्याचे आदेश देणाऱ्या मंत्र्यांची देखील चौकशी करा, असे जरांगे पाटील म्हणाले . त्या काळात आम्हाला कोणी ,कोणी फोन केले आणि काय म्हणाले होते तेही एसआयटीला देतो असे ते म्हणाले. आम्ही दोन शिव्या घातल्या तर जिव्हारी लागले. आमच्या माय माऊलीवर लाट्या चालवल्या गोळीबार केला तेव्हा आम्हाला कसे वाटले असेल? असा सवाल त्यांनी फडणवीस यांना केला. तसेच देवेंद्र फडणवीस मराठा समाजासाठी आजपर्यंत काय काय केले हे सांगत आहेत त्यांनी फक्त मराठा समाजाला दिले का इतर समाजाला दिले त्याचं काय मागील 70 वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करतोय ते दिले नाही आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे आणि ते घेतल्याशिवाय राहणार नाही.
तरी मागे हटणार नाही
मराठा समाजाने तुमचा मुलगा म्हणून माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी समाजाला केले. मी कुणाचा एक रुपयाही घेतलेला नाही यामुळे यांनी कितीही एसआयटी नेमल्या तरी काही फरक पडणार नाही. समाजासाठी लढताना मला जेलमध्ये जावे लागले. तरी मी मागे हटणार नाही. एवढेच नव्हे जातीसाठी माझा मृत्यू झाला तरी तो मी आनंदाने स्वीकारेल असेही जरांगे म्हणाले.
आरक्षणाविरुद्ध बोलणाऱ्यास सोडणार नाही
मागील सहा महिन्यात फडणवीस विरुद्ध मी बोललो नाही पण ते आता खुनशीपणाने वागत असल्याचे दिसल्याने त्यांच्या विरोधात बोललो. मी कोणत्याही राजकीय पक्ष अथवा नेत्यांच्या विरोधात आणि जवळचा नाही .जो मराठा आरक्षणाविरुद्ध बोलेल त्याला आपण सोडणार नाही .हा आपला नियम असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षण आंदोलन संपलेले नाही तीन मार्च रोजी शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.