मनपाचे आणखी एक नाट्य
By Admin | Updated: April 28, 2016 00:16 IST2016-04-28T00:05:50+5:302016-04-28T00:16:50+5:30
औरंगाबाद : महानगरपालिकेच्या नगररचना विभागात अलीकडेच टीडीआर घोटाळा उघडकीस आला. या घोटाळ्यात एफआयआर दाखल करावा, असे आदेश सोमवारी मनपा आयुक्तांनी दिले.

मनपाचे आणखी एक नाट्य
औरंगाबाद : महानगरपालिकेच्या नगररचना विभागात अलीकडेच टीडीआर घोटाळा उघडकीस आला. या घोटाळ्यात एफआयआर दाखल करावा, असे आदेश सोमवारी मनपा आयुक्तांनी दिले. आयुक्तांच्या आदेशानंतरही मनपा अधिकारी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते. बुधवारी सायंकाळी टीडीआर घोटाळ्यातील जमीन मालकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. मात्र, या प्रकरणात अगोदरच गुन्हा दाखल असल्याने तक्रार घेण्यास पोलिसांनी नकार दिला.
डिसेंबर २०१५ मध्ये नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने काही भागात टीडीआर दिल्याच्या तक्रारी समोर आल्या. याची चौकशी केली असता त्यात बरेच तथ्य असल्याचे आढळून आले. चौकशी अहवालाच्या आधारावर मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी नगररचना सहसंचालक डी. पी. कुलकर्णी यांच्यासह तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले. यानंतर मनपा आयुक्तांनी फौजदारी कारवाई करण्याचे आदेश नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना दिले. मागील दोन दिवसांपासून अधिकारी गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते. बुधवारी जमीन मालकांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय मनपा अधिकाऱ्यांनी घेतला. विभागीय चौकशी पूर्ण झालेली नसताना मनपा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करता येत नाहीत, अशी भूमिकाही मनपाने घेतली. सायंकाळी मनपाचे अधिकारी सिटीचौक पोलीस ठाण्यात गेले. मात्र, गुन्हा दाखल होऊ शकला नाही.