विद्यापीठात बोगस कागदपत्राने आणखी एकाचा पीएच.डी. प्रवेश?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 12:11 IST2025-05-17T12:11:04+5:302025-05-17T12:11:42+5:30
विद्यापीठाने गुन्हा दाखल करण्याची रिपाइंची मागणी

विद्यापीठात बोगस कागदपत्राने आणखी एकाचा पीएच.डी. प्रवेश?
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बाेगस कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेतलेल्या दोन शिक्षण संस्थाचालकावर प्रशासनाने गुन्हा दाखल केला होता. त्याच पद्धतीने आणखी एकाने पीएच.डी.ला प्रवेश घेतल्याचे कागदपत्रे समोर आली आहेत. या संबंधित विद्यार्थ्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी रिपाइंतर्फे (आठवले गट) कुलगुरूंकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांना रिपाइंचे शहराध्यक्ष नागराज गायकवाड यांनी निवेदन दिले. या निवेदनानुसार प्राणीशास्त्र विषयात सिद्दीक मोहमद शोएब हबीबोद्दीन याने नोव्हेंबर २०२१ मध्ये पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेतला होता. त्यासाठी महात्मा गांधी विद्यापीठ, वाराणसी, उत्तर प्रदेश येथे बी.एस्सी. व एम.एस्सी. अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे कागदपत्रे सादर केली होती. या कागदपत्रांवर संशय असल्यामुळे गायकवाड यांनी महात्मा गांधी विद्यापीठाचे कुलगुरू, परीक्षा संचालकांशी संपर्क साधत संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार विद्यापीठाच्या अभिलेखांमध्ये सिद्दीक याने शिक्षण घेतल्याची नोंद आढळली नसल्याचे समोर आले. त्यामुळे त्याच्यावरही विद्यापीठाने कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव आस्मा खान व सहसचिव मकसूद खान यांच्याप्रमाणे गुन्हा नोंदविण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे. याविषयी सिद्दीकी मोहम्मद शोएब यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.
तीन आरोपींना मिळाला जामीन
नागराज गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनानुसार विद्यापीठ प्रशासनाने पडताळणी केल्यानंतर पीएच.डी.ला प्रवेश घेणारे आस्मा खान, मकसूद खानच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात २६ मार्च रोजी गुन्हा नोंदवला. या गुन्ह्यात ३० मार्चला आस्मा खानला अटक झाली. तिचा पती मजहर खानला ६ एप्रिल रोजी अटक झाली. बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळविणारा शेख मोहम्मद हाफीज उर रहेमान आणि डॉ. शंकर अंभोरेला १८ एप्रील रोजी अटक केली. या पाच आरोपींशिवाय दिल्लीच्या राजीवसिंग प्रेमसिंग अरोरा यास ६ मेला अटक केले. आरोपीमधील मकसूद खानला अटकपूर्व जामीन मिळाला हाेता, तर १५ मे रोजी आस्मा खान, मजहर खान आणि शेख मोहम्मद हाफीज उर रहेमान या तिघांना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. डॉ. अंभोरे आणि अरोरा हे दोघे कारागृहातच आहेत.