संतापजनक ! सॅनिटायझर टाकून श्वानाला जाळण्याचा प्रयत्न; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 13:31 IST2021-04-20T13:30:20+5:302021-04-20T13:31:45+5:30
एक ते दीड वर्षाच्या श्वानाला हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणाने १८ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते ६ वाजेदरम्यान सॅनिटायझर टाकून पेटवून दिले.

संतापजनक ! सॅनिटायझर टाकून श्वानाला जाळण्याचा प्रयत्न; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
औरंगाबाद : एक ते दीड वर्षाच्या श्वानाच्या अंगावर सॅनिटायझर टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना १८ एप्रिल रोजी एमजीएम रुग्णालय परिसरात घडली. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अमोल नावाच्या तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
शहरात मुक्या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशनच्या बेरील सांचिस यांनी याविषयी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीनुसार एमजीएम गेटजवळील साई भोजनालयाजवळ एक ते दीड वर्षाच्या श्वानाला हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणाने १८ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते ६ वाजेदरम्यान सॅनिटायझर टाकून पेटवून दिले. यात हा श्वान गंभीररीत्या भाजल्याची माहिती तक्रारदार यांना सोमवारी सकाळी अनोळखी व्यक्तीने फोनवरून कळविली.
यामुळे तक्रारदार या त्यांच्या एका सहकाऱ्याला सोबत घेऊन घटनास्थळी गेल्या. तेथे त्यांना पाठीमागील जळालेला श्वान नजरेस पडला. यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता यांना कळविली. आयुक्तांच्या निर्देशानुसार सिडको पोलीस ठाण्यात अनोळखी अमोल याच्याविरुद्ध त्यांनी तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीचा शोध सुरू केला.