अनसरवाड्यात अधिकाऱ्यांचा राबता !
By Admin | Updated: November 29, 2014 00:29 IST2014-11-29T00:21:44+5:302014-11-29T00:29:34+5:30
गोविंद इंगळे , निलंगा संसद दत्तक ग्राम योजनेसाठी निलंगा तालुक्यातील अनसरवाडा गावाची निवड खासदारांनी केली आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या विभागाचे अधिकारी भेटी देत आहेत.

अनसरवाड्यात अधिकाऱ्यांचा राबता !
गोविंद इंगळे , निलंगा
संसद दत्तक ग्राम योजनेसाठी निलंगा तालुक्यातील अनसरवाडा गावाची निवड खासदारांनी केली आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या विभागाचे अधिकारी भेटी देत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, गावाचा चेहरामोहरा बदलेल, अशी आशा गावकरी बाळगत आहेत. गाव निवडताना खासदारांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेला कौल पाहिल्याचे दिसते. शिवाय, हे गावही यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या विशेष कामासाठी निवडले होते.
५८२ उंबरठ्यांचे गाव असलेल्या अनसरवाड्यात ३ हजार २२ मतदार असून, राजकारणात हे गाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. भाजयुमोचे जिल्हाध्यक्षपद तसेच पं.स. सदस्य, लातूर जिल्हा दूध डेअरीचे चेअरमन, कृषी विद्यापीठाचे संचालक म्हणून या गावातील कार्यकर्त्यांनी पदे भूषविली असून, सामाजिक सलोखा असलेल्या या गावात विविध जाती-धर्मांचे लोक गुण्या-गोविंदाने नांदतात. विकासाच्या सुविधा म्हणाव्या तेवढ्या नसल्या तरी ग्रामस्थांनी कधी याची ओरड केली नाही. भारत निर्माण योजनेअंतर्गत पाण्याची सुविधा आहे. परंतु, वितरण व्यवस्थित होत नसल्याने पाणीटंचाईचा सामना नेहमीच करावा लागतो. प्राथमिक आरोग्य केंद्र, १३३ के.व्ही. उपकेंद्राची मागणी बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे. आता संसद दत्तक ग्रामयोजनेत गावाची निवड झाल्यामुळे प्रलंबित मागणी मार्गी लागेल, अशी आशाही गावकऱ्यांना आहे. अनसरवाडा गावाला जोडलेले रस्ते खराब झालेले आहेत. त्यामुळे दळणवळणाची गैरसोय होते. संसद दत्तक ग्रामयोजनेत या गावाची निवड झाल्यामुळे अनसरवाडा ते सिंदखेड दोन कि.मी., माकणी दोन कि.मी., शिवरस्ता पाच कि.मी., गुंजरगा ५ कि.मी., येळनूर ८ कि.मी., खडीकेंद्र २ कि.मी., दर्गा रस्ता व स्मशानभूमीचा रस्ता दुरुस्त होईल, अशी अपेक्षा गावकरी व्यक्त करीत आहेत. गावात व शेतीला अत्यंत कमी दाबाची व कमी वेळ वीज मिळते. त्यामुळे बागायती शेतीचे उत्पन्न घटले आहे. जोडव्यवसाय करण्यास काही वाव नाही. वीज नसल्यामुळे भाजीपाला पिके घेणेही शक्य नाही. परंतु, आता संसद दत्तक ग्रामयोजनेत खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी या गावाला आदर्श गाव बनविण्यासाठी निवड केली आहे. त्यामुळे प्रस्तुत सुविधा मिळतील, अशी आशा ग्रामस्थांमध्ये आहे. ४
अनसरवाडा गावात भटक्या विमुक्त समाज राहतो. डोंबारी समाजाचे दोनशेवर नागरिक आहेत. त्यांच्याकडे रेशनकार्ड नाही की, मतदारयादीत नाव. शिक्षणापासून समाज वंचित आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या गावाची निवड दत्तक योजनेत केली. पैसा कितीही लागला तरी तो प्राप्त केला जाईल, असे खा.डॉ. सुनील गायकवाड म्हणाले.४
नाल्यांवर सरळीकरण करून ‘शिरपूर पॅटर्न’ राबवून जलसंधारणाची कामे करावीत. सिंचन वाढल्याशिवाय गावाची प्रगती होणार नाही. हलक्या प्रतीच्या जमिनीला पाण्याची सोय झाल्यावर प्रगती साधता येईल.
- अजित माने, भाजयुमो जिल्हाध्यक्ष
अनसरवाडा गावाला जोडणारे रस्ते अत्यंत खराब आहेत. स्मशानभूमीचा रस्ताही खराब आहे. यामुळे गैरसोय होते. या रस्त्यांची दुरुस्ती आणि मजबुतीकरण केल्यास दळणवळणाची सोय होईल.
-नरसिंग कांबळे, अनसरवाडा
शेतांकडे जाणारे पाणंद रस्ते झाले तर शेतकऱ्यांचा शेतमाल बाहेरगावी व घराकडे आणण्यास सोयीचे होईल. शेतीवरील प्रक्रिया व मार्गदर्शन केंद्र येथे झाल्यास गावाचा विकास होईल.
-अभंग माने, अनसरवाडा
गावात विजेची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. सिंचन विहिरी आहेत, परंतु कमी दाबाची वीज असल्यामुळे बागायती शेती करता येत नाही. त्यासाठी विजेची सोय होणे गरजेचे आहे.
-शिवाजी बडगिरे, अनसरवाडा
एक हजारांपेक्षा जास्त पशुधन गावात आहे. ११०० लिटर्स दूध शहरात जाते. त्यामुळे या गावात पशुवैद्यकीय दवाखाना, युवकांसाठी व्यायामशाळा, मार्गदर्शन केंद्र, पाण्याची सोय व्हावी.
-प्रशांत काळगे, अनसरवाडा
आरोग्य केंद्र, शिक्षणाच्या सुविधा, विजेची समस्या आणि रस्त्यांमुळे गैरसोय अनसरवाडा ग्रामस्थांची होते. या सर्व बाबींवर लक्ष केंद्रीत करावे. जेणेकरून आमच्या गावाला चांगले वैभव प्राप्त होईल.
- विजय सूर्यवंशी, अनसरवाडा