औरंगाबाद जिल्ह्यातून चारा वाहतुकीला बंदी; दुष्काळात जनावरांना जगविण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 19:27 IST2018-11-10T19:25:24+5:302018-11-10T19:27:40+5:30
प्रशासनाने चाऱ्याच्या वाहतुकीवर निर्बंध आणले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातून चारा वाहतुकीला बंदी; दुष्काळात जनावरांना जगविण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान
औरंगाबाद : जिल्ह्यातून चारा वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाने बंदी आणली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत गंभीर दुष्काळ असल्याचे शासनाने ३१ आॅक्टोबर रोजी जाहीर केले आहे. त्यामुळे जून २०१९ अखेरपर्यंत नऊ तालुक्यांतील पशुधन जगविण्यासाठी चाराटंचाई निर्माण होणार नाही, याची दक्षता घेत प्रशासनाने चाऱ्याच्या वाहतुकीवर निर्बंध आणले आहेत.
जिल्ह्यात सरासरीच्या ५३ टक्के पर्जन्यमान झाले. त्यामुळे सर्व तालुक्यांत गंभीर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यात चाराटंचाई भासण्याची शक्यता आहे. येथील उत्पादित चारा पशुधनाला पुरावा या दृष्टीने जिल्ह्यातून परजिल्ह्यात अथवा परराज्यात चारा वाहतूक करण्यास बंदी करण्यात आली आहे. दुष्काळामुळे जनावरांना चारा न मिळाल्यास चाऱ्याची पळवा-पळवी होऊ शकते. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ३० जून २०१९ पर्यंत चारा वाहतूक बंदी करण्यात आली आहे.
२३६ दिवस पुरेल इतकाच चारा
जिल्ह्यात १ लाख ६८ हजार ११८ लहान जनावरे आहेत. ५ लाख ८ हजार ३२ मोठी जनावरे आहेत. शेळी व मेंढी ३ लाख ९१ हजार २३२ आहेत. १० लाख ६७ हजार ४१२ इतके सर्व पशुधन आहे. ३ हजार ७८७ मेट्रिक टन इतका चारा या पशुधनाला रोज लागतो. सध्या ८ लाख ९४ हजार ६३६ मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. २३६ दिवस हा चारा जिल्ह्यातील पशुधनाला पुरेल असा प्रशासनाचा अंदाज आहे. १० लाख २२ हजार ६१६ मेट्रिक टन चारा जून २०१९ पर्यंत लागणार आहे. १ लाख २७ हजार ९८२ मेट्रिक टन चाऱ्याचा तुटवडा जाणवेल. चारा उपलब्ध करण्याचे प्रशासनासमोर आव्हान असेल.