आदर्श पतसंस्थेच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी अनिल मानकापे पोलिसांसमोर शरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 18:25 IST2025-01-03T18:25:10+5:302025-01-03T18:25:34+5:30
१८ महिन्यांनंतर शरण; अटक झालेला सोळावा आरोपी

आदर्श पतसंस्थेच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी अनिल मानकापे पोलिसांसमोर शरण
छत्रपती संभाजीनगर : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील २०२ कोटींच्या घोटाळ्यात पसार अंबादास मानकापेचा मुलगा अनिल मानकापे याने १८ महिन्यांनंतर अखेर पोलिसांसमोर शरणागती पत्करली. शुक्रवारी त्याला पोलिस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
१२ जुलै २०२३ रोजी अंबादास मानकापेच्या पतसंस्थेत २०२ कोटींचा घोटाळा उघडकीस आला. सिडको पोलिस ठाण्यात या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले. यात आतापर्यंत अंबादाससह त्याचा एक मुलगा, दोन सुनांसह १५ जणांना अटक करण्यात आली. ठेवीदारांनी यात रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडल्याने पोलिस प्रशासनासह गृह मंत्रालयानेदेखील याची गंभीर दाखल घेतली. ऑगस्ट २०२४ मध्ये शासनाने मानकापे व पतसंस्थेच्या ५६.१८ कोटींच्या ४६ संपत्तीच्या लिलावला परवानगी दिली होती.
एकूण पाच गुन्हे दाखल
पहिल्या गुन्ह्यानंतर घोटाळ्याची व्याप्ती वाढत मानकापे व त्याच्या कुटुंबावर पाच गुन्हे दाखल झाले. पोलिस निरीक्षक संभाजी पवार, सहायक निरीक्षक मोसीन सय्यद, उपनिरीक्षक अशोक अवचार यांच्या पथकाने या प्रकरणी तपास केला. पुरवणी दोषारोपपत्रात मानकापेच्या आणखी काही संपत्तींचा समावेश करण्यात आला आहे.
पंढरपूर, तुळजापुराच्या मठांमध्ये मुक्काम
मानकापेच्या एका संपत्तीचा प्रकरणात अनिल अनेकदा शहरात येऊन गेला. तो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात रजिस्ट्रीसाठी येऊन गेल्याचादेखील आरोप करण्यात आला. मानकापेचा मुख्य बंगला शासनाने ताब्यात घेतल्याने त्याचे कुटुंब सध्या शहरात भाडेतत्त्वावरच्या घरात राहत आहे. गेली दीड वर्ष अनिल पंढरपूर, तुळजापूर परिसरातील मठामध्ये मुक्कामी होता. दरम्यान, अंबादासच्या दोन्ही सुनांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने सध्या त्या बाहेर आहेत.