लासूर स्टेशन: गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव जिल्हा परिषद गटात शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एक अत्यंत नाट्यमय आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला. उद्धवसेनेच्या अधिकृत उमेदवाराचे पती आणि माजी सभापती सुनील केरे यांनी पक्षाला अंधारात ठेवून पत्नीचा उमेदवारी अर्ज गुपचूप मागे घेतल्याचा आरोप करून संतापलेल्या शिवसैनिकांनी सांवगी चौकात गाठून त्यांच्या अंगावर शाई फेकत तीव्र निषेध नोंदवला.
शिल्लेगाव गटातून उद्धवसेनेने पंचायत समितीचे माजी सभापती सुनील केरे यांच्या पत्नी सविता केरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक नेते आणि वरिष्ठ नेतृत्वाला कोणतीही पूर्वकल्पना न देता आपला अर्ज मागे घेतला. या निर्णयामुळे उद्धवसेना या गटातून अधिकृतपणे निवडणूक रिंगणाबाहेर फेकली गेली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारानेच माघार घेतल्याने पक्षाची मोठी नाचक्की झाल्याचा आरोप करीत शिवसैनिक संतप्त झाले होते. अर्ज मागे घेतल्यापासून सुनील केरे हे 'नॉट रिचेबल' होते. त्यांचा मोबाईल फोन बंद होता, असा शिवसैनिकांचा आरोप आहे. शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास सुनील केरे सांवगी चौकात दिसताच, उद्धवसेनेचे निवडणूक निरीक्षक राजेंद्र दानवे आणि नंदू लबडे यांनी कार्यकर्त्यांसह त्यांना गाठून माघारीबद्दल जाब विचारला. केरे उत्तर देत असतानाच उपस्थित कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी केरे यांच्यावर शाई ओतली.
'खोक्यां'चा आरोप आणि विश्वासघाताचा शिक्का‘पक्षाने दिलेली उमेदवारी तुमची वैयक्तिक नव्हती, तर ती पक्षाच्या निष्ठेवर दिलेली होती. पक्षाला अंधारात ठेवून माघार घेणे म्हणजे राजकीय गद्दारी आहे,’ अशा शब्दांत यावेळी राजेंद्र दानवे यांनी संताप व्यक्त करून केरे यांना धारेवर धरले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, त्यामध्ये कार्यकर्ते केरे यांनी 'खोके' (पैसे) घेऊन माघार घेतल्याचा थेट आरोप करताना दिसत आहेत. या सर्व गोंधळात सुनील केरे मात्र निमूटपणे उभे होते, त्यांनी एक शब्दही उच्चारला नाही.
केरे यांच्या हकालपट्टीची मागणीया प्रकारामुळे शिल्लेगाव गटातील निवडणुकीला आता वेगळे वळण लागले आहे. आपल्याच उमेदवाराने दगा दिल्याने कार्यकर्ते हतबल झाले असून, सुनील केरे यांच्यावर पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे. या घटनेचे पडसाद आगामी मतदानावर उमटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
वरिष्ठाना बोलणारशिल्लेगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढायची माझी तयारी नसताना मला बळजबरीने उद्धवसेनेकडून बी फार्म देण्यात आला. मला चहा घेण्यासाठी बोलावून केलेला प्रकार चुकीचा आहे. मी याबाबत पक्षाच्या वरिष्ठाना बोलणार आहे.-सुनील केरे, माजी सभापती, पंचायत समिती, गंगापूर
Web Summary : Uddhav Sena candidate's husband withdrew nomination without informing party leaders. Angered Shiv Sainiks protested by throwing ink. Accusations of accepting bribes surfaced, demanding his expulsion. The incident has stirred the election in Shillegav.
Web Summary : उद्धव सेना के उम्मीदवार के पति ने पार्टी नेताओं को बिना बताए उम्मीदवारी वापस ली। नाराज शिवसैनिकों ने स्याही फेंककर विरोध किया। रिश्वत लेने के आरोप लगे, निष्कासन की मांग उठी। इस घटना ने शिल्लेगाव में चुनाव को गरमा दिया है।