...आणि तीळगुळाने जुळल्या पुन्हा संसाराच्या गाठी
By Admin | Updated: January 17, 2016 00:05 IST2016-01-16T23:36:28+5:302016-01-17T00:05:39+5:30
औरंगाबाद : मकरसंक्रांत हा सुवासिनींसाठी महत्त्वाचा सण मानला जातो. एकमेकांमधील कटुता दूर करून नव्या विचारांची जपणूक व आदर करायला शिकविणारा हा सण ‘तीळगूळ’ वाटून साजरा केला जातो.

...आणि तीळगुळाने जुळल्या पुन्हा संसाराच्या गाठी
औरंगाबाद : मकरसंक्रांत हा सुवासिनींसाठी महत्त्वाचा सण मानला जातो. एकमेकांमधील कटुता दूर करून नव्या विचारांची जपणूक व आदर करायला शिकविणारा हा सण ‘तीळगूळ’ वाटून साजरा केला जातो. तीळगूळ, वाणाचे साहित्य देवाला वाहून महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात ती याच दिवशी, पण याच दिवशी पोलिसांत गेलेला वाद मिटवून पती-पत्नी एकत्र आल्याने महिला साह्य कक्षात मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर वाण लुटण्याचा एक अनोखा क्षण पोलीस आयुक्तालयाने अनुभवला.
पोलीस आयुक्तालयातील महिला तक्रार निवारण कक्षात जानेवारी महिन्यातील पंधरा दिवसांमध्ये जवळपास १०० अर्ज दाखल झाले आहेत. ताजनापूर (ता. खुलताबाद) येथील मुलगी आणि खामगाव (ता. बदनापूर, जि. जालना) येथील मुलगा यांचे २०१० मध्ये लग्न झालेले आहे. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्ये आहेत. साडेतीन वर्षांपूर्वी पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. प्रकरण विकोपाला जाऊन पोलिसांत दाखल झाले. तब्बल साडेतीन वर्षे पोलीस दोघांचेही समुपदेशन करीत होते; परंतु वेगवेगळे कारण पुढे करून हे दाम्पत्य एकत्र येण्यास टाळाटाळ करीत होते.
शुक्रवार, १५ जानेवारी २०१६ रोजी या प्रकरणाची सुनावणी ठेवण्यात आली होती. पोलिसांनी तळमळीने सुखाच्या संसारासाठी तुमच्या दोघांचेही योगदान किती महत्त्वाचे आहे, हे पटवून सांगितले. त्यानंतर हे दाम्पत्य एकत्र येण्यासाठी राजी झाले. ऊसतोड मजूर असलेला पती पोलिसांच्या समुपदेशानंतर अतिशय प्रगल्भपणे बोलत होता. यासाठी महिला तक्रार निवारण कक्षातील पोलीस निरीक्षक शिनगारे, जमादार सुभाष चव्हाण, शकिला पठाण यांनी प्रयत्न केले.
असा प्रकार दुसऱ्या एका दाम्पत्याबाबत घडला. आजारी असलेल्या नणंदेला डबा करून देण्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या या दाम्पत्याचा चार महिन्यांपूर्वीच म्हणजे लग्नानंतर दोनच महिन्यात हा वाद पोलिसांत आला. शुक्रवारी तक्रार निवारण कक्षातील कर्मचाऱ्यांनी या दाम्पत्यामध्ये समेट घडवून आणली.
मकरसंक्रांत या सणाला महिला मंदिरात जाऊन तीळगूळ, वाणाचे साहित्य म्हणजे पेरू, बोरं, ऊस, ज्वारी, कापूस इ. सारखे साहित्य बोळक्यांमध्ये घालून झाकून हे वाण लुटतात. पतीला दीर्घायुष्य मिळावे आणि कुटुंबियांवर सुख-समाधानाची छाया कायम राहावी म्हणून महिला उपवास ठेवतात.