अन् अनोळखी मिरवणूक मार्गाने अडखळले कार्यकर्ते
By Admin | Updated: September 28, 2014 01:03 IST2014-09-28T00:37:21+5:302014-09-28T01:03:04+5:30
औरंगाबाद :कार्यकर्त्यांना या अनोळखी मिरवणूक मार्गामुळे चुकल्या चुकल्यासारखे वाटत होते.

अन् अनोळखी मिरवणूक मार्गाने अडखळले कार्यकर्ते
औरंगाबाद : क्रांतीचौक ते जिल्हाधिकारी कार्यालय हा चिरपरिचित मिरवणूक मार्ग; परंतु जिल्हा प्रशासनाने मतदारसंघनिहाय स्वतंत्र प्रशासकीय कार्यालय उभारल्याने उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी निघालेल्या मिरवणुकांमध्ये सहभागी कार्यकर्त्यांना या अनोळखी मिरवणूक मार्गामुळे चुकल्या चुकल्यासारखे वाटत होते. मिरवणुका व आंदोलनाचे स्थळ म्हणून क्रांतीचौकाची ख्याती आहे. बहुतांश मिरवणुका येथूनच सुरू होतात. शहरात शक्तिप्रदर्शन करण्याचा हा एक राजमार्गच; परंतु यावेळेस प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने प्रशासनाने विधानसभानिहाय कार्यालये उघडली. त्यामुळे नाइलाजाने उमेदवारांना आपला मिरवणूक मार्ग बदलावा लागला. मिरवणुकीस प्रारंभ कोठून करावा हेच अनेक उमेदवारांचे लवकर ठरत नव्हते. कोणत्या मार्गाने जावे, त्यातून शक्तिप्रदर्शन कसे होईल याची चिंताही उमेदवार व त्यांच्या समर्थकांना लागलेली दिसली.