अनाथांचे ‘नाथ’ बनून लुटीचा मांडताहेत ‘डाव’

By Admin | Updated: May 18, 2015 00:20 IST2015-05-18T00:09:36+5:302015-05-18T00:20:06+5:30

पंकज जैस्वाल , लातूर सर्वधर्मीय अनाथ नववधूवरांचा ११ जोडप्यांचा विवाह सोहळा जागतिक महिला दिनी आयोजित केला असल्याचे भासवून काही जणांनी लातूर जिल्ह्यातील अनेकांकडून निधी गोळा केला़

Anand's 'nath' is being plundered by 'Daav' | अनाथांचे ‘नाथ’ बनून लुटीचा मांडताहेत ‘डाव’

अनाथांचे ‘नाथ’ बनून लुटीचा मांडताहेत ‘डाव’


पंकज जैस्वाल , लातूर
सर्वधर्मीय अनाथ नववधूवरांचा ११ जोडप्यांचा विवाह सोहळा जागतिक महिला दिनी आयोजित केला असल्याचे भासवून काही जणांनी लातूर जिल्ह्यातील अनेकांकडून निधी गोळा केला़ मान्यवरांच्या नावाखाली लुटलेली ही ‘माया’ लाखोंच्या घरात असल्याचे बोलले जात आहे़ गेल्या दोन महिन्यात अनाथांचा हा विवाह सोहळा झालाच नाही़ ज्यांनी सत्कार्य म्हणून देणगी दिली त्यांना पश्चाताप होत असून, अनाथांचे तथाकथित नाथ बनलेल्या या टवाळखोरांच्या झूंडीने लुटीचा डाव मांडल्याचे समोर आले आहे़
लातूरमधील एका फाऊंडेशनने ११ अनाथ मुला-मुलींचा विवाह ८ मार्च रोजी बाभळगाव-म्हाडा येथील एका शाळेमध्ये आयोजित केल्याची पत्रिका काढली़ मात्र तेथे विवाह सोहळा झालाच नसल्याचे शाळा प्रशासन सांगत आहे़ विवाहसोहळ्याचे स्वागताध्यक्ष म्हणून खा़सुनिल गायकवाड यांचे नाव दिलेले आहे़ परंतु, त्यांचे स्वीय सहाय्यक सारंग वाघमारे यांच्याकडे विचारणा केली असता अशा पद्धतीच्या कुठल्याही कार्यक्रमाचे निमंत्रण त्यांना नव्हते़ ८ मार्च रोजी खासदार परगावी देवणी येथे होते, असे त्यांनी सांगितले़
या निमंत्रण पत्रिकेवर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी राज्यमंत्री आ़ दिलीपराव देशमुख यांचे नाव आहे़ प्रमुख पाहूणे म्हणून रक्तदाते पारससेठ चापसी, डॉ़विठ्ठल लहाने, डॉ़ सुधीर देशमुख, अ‍ॅड़ शैलेश गोजमगुंडे, माजी आ़ पाशा पटेल, उपविभागीय पोलिस अधिकारी वामन खरात यांची नावे आहेत़ त्यापैकी पारससेठ चापसी, अ‍ॅड़ शैलेश गोजमगुंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी वामन खरात यांच्याशी संपर्क साधला असता अशा पद्धतीचा कुठलाही कार्यक्रम आपणास माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले़ अनाथांच्या विवाह सोहळ्यासाठी देणगी देणारे हात ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ असे म्हणत आहेत़ आयोजन समितीमधील सदस्यांकडे विचारणा केली असता ते टोलवाटोलवीची भाषा करीत आहेत़ वास्तविक कार्यक्रमाचा कुठलाही पुरावा त्यांच्याकडे दिसत नाही़ अनाथ ११ जोडप्यांची नावे त्यांच्याकडे नाहीत़ मान्यवरांना कसलेही निमंत्रण पोहचले नसल्याचेही समोर आले आहे़ एकंदर या प्रकाराने आयोजकांचे गौडबंगाल उघडे पडले असून, मान्यवरांच्या नावांचा गैरवापर व अनाथांच्या नावाचा बाजार मांडून निधी उकळला जात असल्याचे समोर आले आहे़
या कार्यक्रमाची व फाऊंडेशनची धर्मादाय आयुक्तालयामार्फत चौकशी होणे गरजेचे आहे़ ८ मार्च २०१५ रोजीचा अनाथांचा विवाह सोहळा अद्यापर्यंत झाला नसल्याचेही देणगीदारांनी सांगितले़ यामध्ये व्यापाऱ्यांसह शासकीय अधिकाऱ्यांनी मोठ्या रकमा दिल्या असल्याचे बोलले जात आहे़ त्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे़

Web Title: Anand's 'nath' is being plundered by 'Daav'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.