टंचाईवर विंधन विहिरींची मात्रा

By Admin | Updated: May 21, 2014 00:14 IST2014-05-21T00:05:02+5:302014-05-21T00:14:45+5:30

आशपाक पठाण , लातूर लातूर शहराला गेल्या चार महिन्यांपासून पाणीटंचाईच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत.

Amount of fuel wells on scarcity | टंचाईवर विंधन विहिरींची मात्रा

टंचाईवर विंधन विहिरींची मात्रा

 आशपाक पठाण , लातूर लातूर शहराला गेल्या चार महिन्यांपासून पाणीटंचाईच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. नळाला महिन्यातून तीनवेळा पाणी येत आहे. तेही अपुरेच मिळत असल्याने पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. खाजगी विंधन विहिरींना पाणी असले तरी त्या पाण्याची विक्री टंचाईमुळे जोरात सुरू आहे. काही भागांत १ रुपया, तर काही भागांत २ रुपयांना घागरभर पाणी विकले जात आहे. टंचाईवर उपाययोजना म्हणून मनपा प्रशासनाने विंधन विहिरी खोदण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पाण्यासाठी नागरिकांची ओरड वाढल्यानंतर मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मनपा कार्यक्षेत्रातील ३५ प्रभागांत आवश्यकतेनुसार विंधन विहिरी खोदण्यासाठी ई-टेंडरिंगद्वारे निविदा मागविण्यात आल्या आहेत. विंधन विहीर खोदणे, केसिंग पाईप बसविणे, पाणी चाचणी करणे व कॅप बसविणे यासाठी केवळ दोन निविदा प्रारंभी आल्या होत्या. मात्र हातपंप बसविणे व कट्टा टाकी बसविणे यासाठी एकही निविदा आलेली नव्हती. त्यामुळे मनपा प्रशासनाने २० मे रोजी फेरनिविदा काढली आहे. तातडीची पाणीपुरवठा योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेला हा उपक्रम पूर्णत्वास कधी जाणार, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. सध्या पाणीटंचाईमुळे भटकंती करणार्‍या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेष म्हणजे पाणी विक्रीच्या व्यवसायाला लातुरात सध्या चांगले दिवस आले आहेत. खाजगी पाणी विक्रीचा व्यवसाय करणार्‍यांची संख्या वाढली आहे. ३०० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत टँकर विक्री होत आहे. ५०० लिटर्सपासून ते ५००० लिटर्सच्या टँकरमधून पाणी विक्री केली जात आहे. एमजीपीकडे लातूर शहराचा पाणीपुरवठा असला, तरी मांजरा प्रकल्प व साई बॅरेजेसमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणीटंचाईचे चटके वाढले आहेत. मनपाने नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तातडीची उपाययोजना हाती घेतली आहे. त्यानुसारच हातपंप, विंधन विहिरींची दुरुस्ती तात्काळ केली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तातडीच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत लातूर शहर महानगरपालिकेने विंधन विहीर खोदणे, हातपंप बसविणे, कट्टा टाकी बांंधणे व बसविणे यासाठी दहा दिवसांपूर्वी निविदा काढली होती. १९ मेपर्यंत ई-टेंडरिंगद्वारे कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळाला नसल्याने नव्याने २० मे रोजी फेरनिविदा काढण्यात आली आहे. कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने फेरनिविदा काढण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात कामाला प्रारंभ होणार कधी? नागरिकांना पाणी मिळणार कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मे महिन्याचा शेवटचा आठवडा शिल्लक असून, जून महिन्यात मान्सूनचे आगमन होते. पावसाळा सुरू झाल्यावर मनपाचे तातडीचे पाणी मिळणार काय? अशी चर्चा नागरिकांतून सुरू आहे. मनपा कार्यक्षेत्रात असलेल्या बहुतांश विंधन विहिरींना पाणी सुरू आहे. आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच पाईपलाईनचे कामही करण्यात येत आहे. सध्या असलेल्या विंधन विहिरी बंद पडल्यास नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून नवीन प्रभागनिहाय ३५ विंधन विहिरींना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळेच निविदा मागविण्यात आल्या आहेत. सध्या असलेली योजना बंद पडल्यावर ही उपाययोजना असल्याने विलंब वगैरे काही नसल्याचे महापौर स्मिता खानापुरे यांनी सांगितले.

Web Title: Amount of fuel wells on scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.