रुग्णवाहिका चालकाचा टाईमपास, स्ट्रेचरवरून वाॅर्डकडे नेताना रुग्णाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 15:59 IST2025-05-19T15:58:38+5:302025-05-19T15:59:17+5:30

रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिका चालकाला रुग्णाला वाॅर्डकडे नेण्याची विनंती केली. पण रुग्णवाहिका चालकाने त्याकडे दुर्लक्ष केले.

Ambulance driver's timeout, patient dies while being taken to ward on stretcher | रुग्णवाहिका चालकाचा टाईमपास, स्ट्रेचरवरून वाॅर्डकडे नेताना रुग्णाचा मृत्यू

रुग्णवाहिका चालकाचा टाईमपास, स्ट्रेचरवरून वाॅर्डकडे नेताना रुग्णाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : अपघात विभागातून रुग्णाला वाॅर्डकडे घेऊन जाण्याऐवजी रुग्णवाहिका चालक अर्धा तास टाईमपास करत राहिला. त्यामुळे रुग्णाला नातेवाईकांनाच स्ट्रेचरवरून वाॅर्डकडे घेऊन जावे लागले. मात्र, वाॅर्डात पोहोचेपर्यंत रुग्णाने अखेरचा श्वास घेतला. रुग्णवाहिका चालकाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याने कारवाईची मागणी करत रविवारी घाटी रुग्णालयात नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यामुळे काही वेळेसाठी घाटीत तणावाचे वातावरण होते.

आनंद बाबुराव चांदणे (४६, रा. फाजलपुरा) असे मयत रुग्णाचे नाव आहे. उलट्यांचा त्रास होत असल्याने त्यांना नातेवाईकांनी रविवारी सकाळी घाटीतील अपघात विभागात दाखल केले. याठिकाणी प्राथमिक औषधोपचार आणि सोनोग्राफी, एक्स-रे, सीटी स्कॅन तपासणीनंतर डाॅक्टरांनी मेडिसीन विभागाच्या वाॅर्ड क्र. ३७ मध्ये नेण्यास सांगितले. रुग्णाला नेण्यासाठी अपघात विभागासमोर घाटीची रुग्णवाहिका होती. रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिका चालकाला रुग्णाला वाॅर्डकडे नेण्याची विनंती केली. पण रुग्णवाहिका चालकाने त्याकडे दुर्लक्ष केले. अर्धा तास तेथेच टाईमपास करत राहिला. त्यामुळे अखेरीस नातेवाईकांनीच स्ट्रेचरवरून रुग्णाला वाॅर्डकडे नेले. मात्र, वाॅर्डात गेल्यानंतर तेथील डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले. रुग्ण वाॅर्डात पोहोचल्यानंतर रुग्णवाहिका रिकामीच आली, असे मयत रुग्णाचे भाऊ संदीप चांदणे म्हणाले.

मृतदेह न घेण्याचा पवित्रा
चालकावर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. त्यामुळे काही वेळेसाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले. अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. गायत्री तडवळकर यांनी नातेवाईकांशी संवाद साधत चौकशी आणि कारवाईचे आश्वासन दिले.

चालकावर कारवाई व्हावी
रुग्णवाहिका चालकाच्या हलगर्जीपणामुळे भावाचा मृत्यू झाला. त्याच्यावर रुग्णालय प्रशासनाने कारवाई केली पाहिजे. रुग्णालय प्रशासन आणि बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
- संदीप चांदणे, मयत रुग्णाचा भाऊ

दोषीवर कठोर कारवाई करू
रुग्णाच्या नातेवाईकांना तक्रार करण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल प्रशासनाकडून घेण्यात आली असून, दोषीवर कठोर कारवाई करण्यात येईल.
- डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता

Web Title: Ambulance driver's timeout, patient dies while being taken to ward on stretcher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.