महागाईने मोहरला आंबेमोहोर; तब्बल ४० रुपयांची वाढ, दर थेट एकशेवीस रुपये किलोच्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 11:15 IST2025-09-06T11:14:07+5:302025-09-06T11:15:01+5:30
आंबेमोहोर पाठोपाठ कालीमूछ या तांदळातही किलोमागे ६ ते १० रुपयांची वाढ झाली आहे.

महागाईने मोहरला आंबेमोहोर; तब्बल ४० रुपयांची वाढ, दर थेट एकशेवीस रुपये किलोच्या घरात
छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सव असल्याने, बाप्पाच्या आवडत्या मोदकांचा सुगंध घराघरात दरवळतोय. या मोदकांसाठी खास वापरला जाणारा आंबेमोहोर तांदूळ मात्र यंदा ग्राहकांच्या खिशाला कडक झळ देतो आहे. बाजारात आंबेमोहोरचा दर तब्बल १२० रुपयांच्या घरात पोहोचला असून आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. फक्त आंबेमोहोरच नव्हे तर कालीमूछच्या दरातही वाढ झाली आहे.
आंबेमोहोर एकशेवीसच्या घरात
गेल्या वर्षी आंबेमोहोर तांदूळ ८० ते ८५ रुपयांत मिळत होता. यंदा त्याचा दर किलोमागे ४० रुपयांनी वाढून सध्या १२० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.
खास मोदकांसाठी होतो वापर
गणेशोत्सवात उकडीचे मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखविले जातात. या मोदकासाठी आंबेमोहोर तांदळाला सर्वाधिक पसंती दिली जाते. उकडलेले मोदक या तांदळामुळे नरम, मऊसर आणि सुगंधी लागतो. यामुळे सध्या आंबेमोहोरची मागणी झपाट्याने वाढत आहे. आणि उकडीचे एक मोदक ३५ ते ४० रुपयांना मिळत आहे.
डिसेंबरपर्यंत दर चढेच राहणार
सध्या सुरू असलेले दर लवकर कमी होण्याची चिन्हे नाहीत. नवीन हंगामातील उत्पादन बाजारात येईपर्यंत म्हणजेच डिसेंबरपर्यंत दर स्थिर राहण्याची शक्यता कमी आहे.
- रिंकू खटोड, व्यापारी
कालीमूछमध्येही दरवाढ
आंबेमोहोर पाठोपाठ कालीमूछ या तांदळातही किलोमागे ६ ते १० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या ८० ते ८६ रुपये किलोने कालीमूछ विकल्या जात आहे तर कोलम तांदळाचे भाव ६० ते ७० रुपये किलोने स्थिर आहेत.