‘कुराण किरअत’ स्पर्धेला अलोट गर्दी

By Admin | Updated: May 24, 2014 02:09 IST2014-05-24T01:49:10+5:302014-05-24T02:09:21+5:30

औरंगाबाद : शहरातील ऐतिहासिक जामा मशीद येथे आजपासून दोनदिवसीय ‘कुराण किरअत’ सुरुवात झाली.

Alot rush at 'Quran Kirat' competition | ‘कुराण किरअत’ स्पर्धेला अलोट गर्दी

‘कुराण किरअत’ स्पर्धेला अलोट गर्दी

औरंगाबाद : शहरातील ऐतिहासिक जामा मशीद येथे आजपासून दोनदिवसीय ‘कुराण किरअत’ सुरुवात झाली. रात्री दहा वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेत एकापेक्षा एक दर्जेदार कारी बांधवांनी आपला ‘कलाम’सादर करून उपस्थित भाविकांची दाद मिळविली. मागील काही वर्षांपासून शहरात ‘दारुल किरअत कलिमिया’ यांच्यातर्फे आंतरराष्टÑीय पातळीवर ‘कुराण किरअत’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. २३ आणि २४ मे रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची घोषणा यापूर्वीच संयोजकांनी केल्याने शहरवासीयांचे या स्पर्धेकडे लक्ष लागले होते. आज रात्री स्पर्धेला सुरुवात झाली, तेव्हा ऐतिहासिक जामा मशिदीच्या कॅम्पचा परिसर भाविकांनी खचाखच भरला होता. महिला भाविकांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. स्पर्धेच्या प्रारंभीच अब्दुल हकीम यांनी पवित्र धर्मग्रंथ ‘कुराण’चे काही अध्याय अत्यंत सुरेल स्वरात सादर केले. त्यांचा आवाज अत्यंत पहाडी होता. त्यांच्या या कलामला उपस्थित भाविकांनी दाद दिली. त्यानंतर हाफेज मोहंमद अक्रम यांनी ‘नात’सादर करून वाहवा मिळविली. कारी हाफेज अब्दुल रज्जाक यांनी आपल्या गोड आवाजात ‘कुराण’चे काही अध्याय सादर करून भाविकांना खिळवून ठेवले. मराठी भाषेत शिक्षण झालेले आणि पदवीधर असलेले कारी अब्दुल रहेमान यांनी ‘किरअत’मध्ये काही अध्याय सादर करून उपस्थिताना अंतर्मुख केले. हाफेज अब्दुल जुबैर अख्तर उस्मानी यांनी वेगवेगळ्या पद्धतीने पवित्र कुराण मजीदचे अध्याय सादर केले. एकाच स्वरात आणि पहाडी स्वरात कुराणचे वाचन कशा पद्धतीने करता येऊ शकते हे दाखवून दिले. कारी रहेम कुरैशी या नवोदित तरुणानेही अल्पशा वेळेत आपल्या अंगी असलेली कला स्वराच्या माध्यमाने अप्रतिमरीत्या मांडली. कारी उबेद उर-रहेमान यांनी कुराणमधील ‘सुरे दोहा’ सादर केला. प्रत्येक स्पर्धकाला पाच मिनिटांचा वेळ संयोजकांनी दिला. दरम्यान, मौलाना अनिस -उर -रहेमान नदवी यांनी ‘कुराण’तजवीदने कशी वाचावी यासंदर्भात सविस्तर विवेचन केले. इस्लाममध्ये किरअतचे महत्त्व काय याचीही काही उदाहरणे त्यांनी दिली. रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. शहराच्या वेगवेगळ्या भागातून भाविक किरअत ऐकण्यासाठी आले होते. उद्या रात्रीही इशांच्या नमाजनंतर स्पर्धेला सुरुवात होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. कार्यक्रमास व्यासपीठावर मौलाना रियाजोद्दीन फारुकी, मौलाना मोईज फारुकी, मौलाना रशीद मदनी, अवेज अहेमद, मौलाना मुजीब सहाब यांची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: Alot rush at 'Quran Kirat' competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.