अख्खे गाव लागले देशोधडीला!
By Admin | Updated: July 19, 2014 01:22 IST2014-07-19T01:13:04+5:302014-07-19T01:22:51+5:30
विनोद काकडे, औरंगाबाद एक मिस्त्री, ज्याची दुचाकी घेण्याची ऐपत नव्हती तो ‘केबीसी’मुळे आलिशान चारचाकीत फिरू लागला, फॉरेनच्या ट्रीपला जाऊ लागला...
अख्खे गाव लागले देशोधडीला!
विनोद काकडे, औरंगाबाद
एक मिस्त्री, ज्याची दुचाकी घेण्याची ऐपत नव्हती तो ‘केबीसी’मुळे आलिशान चारचाकीत फिरू लागला, फॉरेनच्या ट्रीपला जाऊ लागला... तो हे करु शकतो तर आपण का नाही? या विचारातून एकेक करून अख्खे गाव केबीसीच्या जाळ्यात अडकले. कुणी शेती, कुणी दागिने विकून गुंतवणूक केली, तर कुणी गुंतवणुकीसाठी इतर मालमत्ता सावकाराकडे गहाण ठेवली. केसीबीने गाशा गुंडाळल्याने हे अख्खे गाव देशोधडीला लागले. स्वत: तर बरबाद झालेच झाले आपल्याबरोबर हजारो मित्र, नातेवाईकांनाही या गावकऱ्यांनी केबीसीच्या नादी लावून देशोधडीला लावले.
पैठण तालुक्यातील मावसगव्हाण. औरंगाबादपासून ३५ किलोमीटर अंतरावर आडवळणीला असलेले दीडशे उंबऱ्यांचे हे गाव. जायकवाडी धरण जवळच असल्यामुळे गाव तसे सधनच. शेती हेच बहुतांश कुटुंबांच्या उपजीविकेचे साधन. सर्व काही सुरळीत होते. दोन वर्षांपूर्वी गावातील सुरेश संपत जाधव हा ‘केबीसी’ची स्कीम घेऊन गावात आला. सुरेश हा पाटबंधारे खात्यात सरकारी नोकरीला आहे.
मिस्त्रीच्या चारचाकीने घातली भुरळ!
गावातील सोपान जाधव हे मिस्त्री काम करायचे. त्यावरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. सुरेशने दाखविलेल्या आमिषाला बळी पडून त्यांनी दोन वर्षांपूर्वी केबीसीमध्ये ७७ हजार रुपये गुंतविले. आणखी काही नातेवाईकांना मेंबर बनविले. त्यामुळे त्यांना केबीसीकडून ६० हजार रुपये कमिशन मिळाले. ही रक्कम वाढतच गेली. काही महिन्यांतच त्यांनी आलिशान कार खरेदी केली. मिस्त्रीचा व्यवसाय सोडून त्यांनी तब्बल साडेतीन हजार मेंबर गोळा केला. त्यामुळे कंपनीकडून त्यांना सिंगापूर, मलेशिया या ट्रीपवर पाठविण्यात आले. जाधव यांची काही महिन्यांतच झालेली प्रगती पाहून गावकऱ्यांना भुरळच पडली.
चिंता अन् स्मशान शांतता
‘लोकमत’ प्रतिनिधीने शुक्रवारी या गावाला भेट दिली. तेव्हा अख्खे गाव मंदिराच्या पारावर जमा झाले होते. गावात स्मशान शांतता पसरली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच चिंता आणि तणाव दिसून येत होता.
आपले पैसे तर गेले; परंतु ज्या नातेवाईकांनी, मित्रांनी गुंतवणूक केली, त्यांचे पैसे परत द्यायचे कसे? गुंतवणुकीसाठी सगळं काही गहाण ठेवले, विकले. आता घर कसे चालवायचे? प्रत्येकासमोर हाच प्रश्न होता.
७० कोटींची गुंतवणूक
या छोट्याशा गावातून केबीसीत सुमारे ७० कोटींची गुंतवणूक झाली आहे. त्यात गावकऱ्यांचा वाटा २० कोटींचा, तर नातेवाईक व मित्रांचा वाटा ५० कोटींचा आहे.
चारचाकींची जप्ती
केबीसीच्या सुरुवातीच्या मिळकतीवर गावातील सहा जणांनी आलिशान चारचाकी गाड्या घेतल्या होत्या. हप्ते थकल्याने बँकांनी आता जप्तीची मोहीम सुरू केली आहे.