औरंगाबाद विमानतळाच्या धावपट्टीवर कुत्रा आल्याने विमान १५ मिनिटे हवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 13:04 IST2018-12-13T13:04:06+5:302018-12-13T13:04:57+5:30
या प्रकारामुळे विमानतळ सुरक्षेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

औरंगाबाद विमानतळाच्या धावपट्टीवर कुत्रा आल्याने विमान १५ मिनिटे हवेत
औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टीवर हुंदडणाऱ्या कुत्र्यामुळे बुधवारी लँड होता होता विमानाला पुन्हा हवेत झेप घ्यावी लागली. किमान १५ मिनिटे विमान हवेत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कुत्र्याला हाकलल्यानंतर विमान पुन्हा उतरले; पण अचानक झालेल्या या प्रकाराने विमानातील लोकप्रतिनिधीसह प्रवासी गोंधळून गेले. मुंबईहून आलेल्या या विमानाबाबत घडलेल्या प्रकारामुळे विमानतळ सुरक्षेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुंबईहून निघालेले विमान औरंगाबादेत पाच वाजता आले. धावपट्टीवर ते उतरत होते. चाके धावपट्टीवर टेकणार असे वाटत असतानाच अचानक विमानाने वेग घेतला आणि ते झपाट्याने पुन्हा झेपावले. टेकण्याच्या बेतात असताना अचानक वेग वाढून विमान पुन्हा झेपावल्याने प्रवासी संभ्रमात होत.
याबाबत चौकशी केल्यावर कळाले की धावपट्टीवर कुत्रे आल्याने विमान उतरवले नाही. मात्र विमानतळाचे अधिकारी असे काही झाले नसल्याचे म्हणाले. काही प्रवासी असा प्रकार घडल्याचे सांगतात.