विमानाच्या टायरमधील हवा उतरली; सकाळचे ‘टेकऑफ ’झाले दुपारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 16:50 IST2020-02-28T16:48:02+5:302020-02-28T16:50:59+5:30
टायरमधील हवेची स्थिती योग्य केल्यानंतरच उड्डाण

विमानाच्या टायरमधील हवा उतरली; सकाळचे ‘टेकऑफ ’झाले दुपारी
औरंगाबाद : ऐन उड्डाणाच्या काही मिनिटांपूर्वी स्पाईस जेटच्या औरंगाबाद-दिल्ली विमानाच्या टायरमधील हवा कमी झाल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडला. यामुळे या विमानाचे उड्डाण थांबविण्यात आले. टायरमधील हवेची स्थिती योग्य केल्यानंतर जवळपास ७ तासांनंतर हे विमान दिल्लीच्या दिशेने झेपावले.
स्पाईस जेटचे दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली विमान दररोज सकाळी ७.३० वाजता येते आणि ८ वाजता दिल्लीला रवाना होते. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी हे विमान औरंगाबादेत दाखल झाले. दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना बोर्डिंग पास देण्यात आले. सुरक्षा तपासणीनंतर हे प्रवासी विमानात जाऊन बसले. काही वेळातच विमान धावपट्टीकडे जाणार होते. मात्र, त्यापूर्वी विमानाच्या सुरक्षा तपासणीत पाठीमागील टायरमध्ये हवा कमी असल्याचे विमानतळाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे उड्डाण थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विमानातील प्रवाशांना पुन्हा विमानतळाच्या इमारतीत बोलविण्यात आले.
अन्य विमानाद्वारे प्रवाशांना दिल्लीला नेण्यासंदर्भात चाचपणी करण्यात आली; परंतु त्यात बराच वेळ जाणार होता. दुसरीकडे टायरच्या दुरुस्ती काम सुरू झाले. अखेर सुरक्षा नियमानुसार आवश्यक प्रमाणात हवा भरण्यात आली. उड्डाणापूर्वी प्रवाशांची पुन्हा सुरक्षा तपासणी करण्यात आली. यात ७ तासांचा कालावधी गेला. सकाळी ८ वाजेचे विमान दुपारी २.३० वाजेच्या सुमारास दिल्लीला रवाना झाले.
काय असतो धोका?
विमानाच्या टायरमध्ये आवश्यक प्रमाणात हवा नसल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. टायरमध्ये हवा कमी असताना धावपट्टीवरून विमान नेल्यास नियंत्रण सुटण्याची भीती असते. त्यामुळे खबरदारी घेतली जाते.