१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!

By प्रशांत तेलवाडकर | Updated: April 29, 2025 19:52 IST2025-04-29T19:51:05+5:302025-04-29T19:52:56+5:30

सुवर्णखरेदी, नवीन कामांना आरंभ, शिक्षण, विवाह, व्यवसाय, गृहप्रवेश आदी शुभकार्यांसाठी अत्यंत उत्तम मुहूर्त असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

After 124 years, a rare combination of Akshaya Tritiya-Chaturthi-Rohini Nakshatra and Wednesday! | १२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!

१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!

छत्रपती संभाजीनगर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानली जाणारी अक्षय तृतीया यंदा एका अद्वितीय योगाचा साक्षीदार ठरणार आहे. ३० एप्रिल रोजी, अक्षय तृतीया, तृतीयासह चतुर्थी, रोहिणी नक्षत्र आणि बुधवारचा दिवस असा दुर्मीळ संयोग साधला आहे. गेल्या १२४ वर्षांत असा योग प्रथमच घडत आहे, असे ज्योतिषशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

यंदा अक्षय तृतीया तृतीया तिथीला सुरू होत असताना चतुर्थीचा स्पर्शही होणार आहे. त्याचवेळी चंद्र रोहिणी नक्षत्रात भ्रमण करणार आहे आणि तोही बुधवारी. बुधग्रहाशी संबंधित शुभवार. या अद्भुत संगमामुळे यंदाची अक्षय तृतीया विशेष फलदायी ठरणार आहे. सुवर्णखरेदी, नवीन कामांना आरंभ, शिक्षण, विवाह, व्यवसाय, गृहप्रवेश आदी शुभकार्यांसाठी अत्यंत उत्तम मुहूर्त असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

१९८२ या वर्षी होती सोमवारी अक्षय तृतीया
वैशाख मासामध्ये अक्षय तृतीया सोमवारी किंवा बुधवारी येणे दुर्मिळ योग मानला जातो. अक्षय तृतीया २६ एप्रिल १९८२ मध्ये सोमवारी आली होती. त्या दिवशी तृतीयासह चतुर्थी अशी होती.

पक्ष्यांना पाणी, जनावरांना चारा द्यावा
शास्त्रात असे म्हटले आहे की, अक्षय तृतीया वैशाख मासामध्ये अक्षय तृतीया व रोहिणी नक्षत्र सोमवारी किंवा बुधवारी आली तर ते अत्यंत दुर्लभ मानली जाते. १९०१ पासूनचे पंचाग पाहिले पण मागील १२४ वर्षांत असा योग आढळून आला नाही. अशा दिवशी कोणी पुण्यकर्म करतील त्याचे फळ सहस्रकोट मिळते. यंदा अक्षय तृतीया बुधवारी आली आहे. पुण्य कर्मासाठी पक्ष्यांसाठी दाणापाण्याची, जनावरांसाठी चारा, पाण्याची सोय करण्यात यावी. पितरांचे श्राद्ध करावे, जलकुंभ दान करावे.
- वे.शा.स. सुरेश केदारे गुरुजी

यंदा परशुराम जन्मोत्सव- अक्षय तृतीया वेगवेगळी
दरवर्षी अक्षय तृतीया व परशुराम जयंती एकाच दिवशी येत असते. मात्र, यंदा मंगळवारी भगवान परशुराम जन्मोत्सव व बुधवारी अक्षय तृतीया आली आहे. मागील १५ वर्षात असा योग येण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी २०१३, २०१६ व २०२० या वर्षी अक्षय तृतीया व भगवान परशूराम जन्मोत्सव एक दिवसाच्या फरकाने आले होते. मात्र नेहमीप्रमाणे यंदाही अक्षय तृतीयेला महात्मा बसवेश्वर जयंती आली असून ती त्याच दिवशी साजरी केली जाणार आहे.

Web Title: After 124 years, a rare combination of Akshaya Tritiya-Chaturthi-Rohini Nakshatra and Wednesday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.