अॅड. गायके आणि नानासाहेब पाटील यांना न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 23:33 IST2019-02-28T23:32:35+5:302019-02-28T23:33:03+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेले अॅड. सदाशिव गायके आणि नानासाहेब पाटील यांना मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. काकडे यांनी गुरुवारी (दि.२८) न्यायालयीन कोठडी सुनावली. या दोघांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले होते.

अॅड. गायके आणि नानासाहेब पाटील यांना न्यायालयीन कोठडी
औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेले अॅड. सदाशिव गायके आणि नानासाहेब पाटील यांना मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. काकडे यांनी गुरुवारी (दि.२८) न्यायालयीन कोठडी सुनावली. या दोघांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले होते.
अॅड. गायके यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी (दि.१) सत्र न्यायालयात सुनावणी होईल. नानासाहेब पाटील यांच्या जामीन अर्जावरसुद्धा शुक्रवारी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.
सरकारी वकील सूर्र्यकांत सोनटक्के यांनी गुरुवारी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले की, पोलीस कोठडीत गायके आणि पाटील यांनी तपासामध्ये सहकार्य केले नाही. २० वर्षे छळ करण्यामागचा उद्देश तपासण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली. त्यांच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्याची विनंती सोनटक्के यांनी केली. तक्रारदार नितीन सुरेश पाटील यांच्या वतीने अॅड. अभयसिंह भोसले यांनी सरकारी वकिलांना साह्य केले.
अॅड. गायके यांच्या वतीने अॅड. सोमनाथ, एस. एस. लड्डा आणि अॅड. सागर एस.लड्डा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, पोलिसांच्या ताब्यात असताना आरोपींनी सर्वतोपरी सहकार्य केले आहे. पोलिसांनी जुन्याच मुद्यावर वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली आहे. आरोपींकडून काहीही हस्तगत करावयाचे नसल्यामुळे त्यांच्या पोलीस कोठडीची गरज नाही. नानासाहेब पाटील यांच्या वतीने अॅड. कय्युम शेख यांनीही पोलीस कोठडी देऊ नये, अशी विनंती केली.
सुनावणीअंती न्यायालयाने दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर गायके यांच्या वतीने अॅड. लड्डा यांनी बुधवारी (दि. २७) सत्र न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल केला असून, त्या अर्जावर शुक्रवारी (दि.१ मार्च) सुनावणी ठेवण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तर नानासाहेब पाटीलच्या वतीने अॅड. कय्युम यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल केला. त्यावर सुनावणी झाली असता न्यायालयाने सरकार पक्षाला त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले. तपास अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी एक दिवसाचा वेळ मागून घेतला. शुक्रवारी त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
----------------