तालुक्यावरुनच चालतो तलाठ्यांचा कारभार

By Admin | Updated: September 10, 2014 00:48 IST2014-09-10T00:16:51+5:302014-09-10T00:48:22+5:30

वडवणी : वडवणी तालुक्यातील जवळपास सर्वच तलाठी तालुक्यावरुनच कारभार हाकत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची परवड होत आहे.

The administration of the Takhts runs through the talukas | तालुक्यावरुनच चालतो तलाठ्यांचा कारभार

तालुक्यावरुनच चालतो तलाठ्यांचा कारभार


वडवणी : वडवणी तालुक्यातील जवळपास सर्वच तलाठी तालुक्यावरुनच कारभार हाकत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची परवड होत आहे. विविध कागदपत्रे काढण्यासाठी त्यांना थेट वडवणीला यावे लागत आहे. अशा या तलाठ्यावर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.
वडवणी तालुक्यात एकूण १४ तलाठी सज्जे असून, वडवणी व कवडगाव हे दोन मंडळ अधिकारी कार्यालये आहेत. ४९ गावांचा कारभार पाहण्यासाठी ११ तलाठी आहेत. ११ तलाठ्यावरच संपूर्ण तालुक्याचा कारभार चालतो.
शासनाने ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी यांचे हाल व नुकसान टाळण्यासाठी लाखो रुपये खर्च करुन तलाठी सज्जे उभे केले. सोयी-सुविधायुक्त कार्यालये बांधण्यात आली. मात्र एकही तलाठी कार्यालयात बसून कारभार पाहत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील दोन वर्षांपासून तालुक्यातील सर्वच तलाठी वडवणीतूनच सज्जांचा कारभार हाकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांसाठी लागणारी स्वाक्षरी व कागदपत्रे घेण्यासाठी वडवणी शहरात यावे लागते. विशेष म्हणजे येथे आल्यानंतरही या तलाठ्यांच्या मनमानी कारभाराला त्यांना सामोरे जावे लागते.
विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन कागदपत्रे देण्याचा कारभारही हे तलाठी करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे.
तालुक्यातील १४ सज्जापैकी एकाही सज्जावर तलाठी हजर नसतो. साळिंबा, खडकी, पुसरा, चिंचोटी, कवडगाव, चिखलबीड, चिंचाळा, तिगाव, देवडी, वडवणी, काडीवडगाव, देवळा, चिंचवण असे एकूण १४ तलाठी सज्जे आहेत. या १४ तलाठी सज्जाचा कारभार ११ तलाठी पाहतात. सज्जावरच्या कार्यालयात न राहता हे तलाठी किरायाच्या खोल्यांमध्ये वडवणी शहरात राहतात. सध्या शासनाच्या विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी जात प्रमाणपत्र, रहिवाशी, कुटुंब मर्यादा प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्रे महत्वाची ठरत आहेत. ही कागदपत्रे मिळविण्यासाठी सकाळपासूनच विद्यार्थी या तलाठ्यांचा शोध घेत असतात. आज इथे तर उद्या तिथे अशाप्रकारे हे तलाठी किरायाच्या खोल्या बदलत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांचा व विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाया जात आहे.
ज्याठिकाणी कार्यालये उभारण्यात आलेली आहेत त्याठिकाणी हे तलाठी हजर रहात नसल्याने ही कार्यालये शोभेची वस्तू बनू लागले आहेत. विद्यार्थी, शेतकरी यांना गावातच कागदपत्रे उपलब्ध करुन द्यावीत व त्यांचे होणारे हाल थांबवावेत, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.
याबाबत तहसीलदार एन.जी. झंपलवाड म्हणाले, तलाठ्यांना मुख्यालयी राहण्याबाबत लेखी सूचना दिल्या आहेत. सूचनांचे पालन न करणाऱ्या तलाठ्यांवर करडी नजर ठेवून कारवाई केली जाईल. विद्यार्थ्यांचे हाल होऊ नयेत, याची काळजी घेऊ. (वार्ताहर)

Web Title: The administration of the Takhts runs through the talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.