प्रशासन अलर्ट; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जमाव बंदीनंतर इंटरनेट सेवा बंद
By विकास राऊत | Updated: November 1, 2023 19:40 IST2023-11-01T19:39:19+5:302023-11-01T19:40:20+5:30
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी

प्रशासन अलर्ट; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जमाव बंदीनंतर इंटरनेट सेवा बंद
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलन, उपोषणांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जमावबंदीचे आदेश जारी केले. शिवाय बुधवारपासून पुढील ४८ तासांसाठी जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा गृहविभागाच्या आदेशाने बंद करण्यात आली आहे.
गृह विभागाकडून आदेश येताच जिल्हा प्रशासनाने तातडीने इंटरनेट सेवा बंद केली. गृहविभागाच्या सचिव सुजाता सौनिक यांनी काढलेल्या आदेशामुळे इंटरनेट सेवा बंद केल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी सांगितले. सोशल मीडियातून मेसेज फॉरवर्ड होऊन चुकीच्या अफवा पसरून सार्वजनिक वातावरण खराब होऊ नये. यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मात्र, याचा फटका ऑनलाईन व्यवहारांना बसला.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी विधाते यांनी बुधवारपासून जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश जारी केले. १५ नोव्हेंबरपर्यंत हे आदेश लागू असतील. शस्त्र बाळगणे, विनापरवानगी पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी आहे. पाचपेक्षा जास्त व्यक्ती जमण्यासाठी सभा, मिरवणूक, मोर्चास परवानगी देण्याचे अधिकार ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी नेमलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.