बंडखोरांच्या मतदारसंघात 'आदित्य'चा शिवसंवाद; दोन दिवस औरंगाबादेत यात्रा, मेळावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 13:56 IST2022-07-21T13:55:20+5:302022-07-21T13:56:20+5:30
मुंबईत पहिल्या टप्प्यात यात्रा झाल्यानंतर आता मराठवाड्यातील राजधानी व बंडखोरीपूर्वी शिवसेनेचा गड राहिलेल्या औरंगाबादमध्ये २२ जुलैला ते येत आहेत.

बंडखोरांच्या मतदारसंघात 'आदित्य'चा शिवसंवाद; दोन दिवस औरंगाबादेत यात्रा, मेळावे
औरंगाबाद : जिल्ह्यातील शिवसेनेचे सहापैकी पाच आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. ही बंडखोरी जिव्हारी लागल्यामुळे जिल्ह्यातील बंडखोरांच्या मतदारसंघात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे २२ जुलै रोजी शिवसंवाद यात्रा काढून बंडखोरांना आव्हान देणार आहेत.
वैजापूर, बिडकीन, औरंगाबाद मध्य व पश्चिम मतदारसंघात ही यात्रा असून २२ रोजी सायंकाळी संत एकनाथ रंगमंदिर येथे आदित्य यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांनी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बुधवारी बैठक घेतली. बैठकीला माजी महापौर नंदकुमार घोडेले, युवासेना उपसचिव ऋषि खैरे, जिल्हा युवाधिकारी हनुमान शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीला चार ते पाच माजी नगरसेवकांनी दांडी मारली होती. शिवसेनेला २१ जूनपासून बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. आमदार, खासदार, शिवसेना नेते, नगरसेवक पक्ष सोडून मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात जात आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य यांनी बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा काढण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान जिल्हा युवा अधिकारी शिंदे यांनी सांगितले, पूर्ण ताकदीने शिवसंवाद यात्रेची तयारी सुरू आहे.
या ठिकाणी जाणार शिवसंवाद यात्रा
मुंबईत पहिल्या टप्प्यात यात्रा झाल्यानंतर आता मराठवाड्यातील राजधानी व बंडखोरीपूर्वी शिवसेनेचा गड राहिलेल्या औरंगाबादमध्ये २२ जुलैला ते येत आहेत. दुपारी १ वाजता वैजापूर, ४ वा. खुलताबाद, ६ वा. संत एकनाथ रंगमंदिरात मेळावा ते घेतील. २३ जुलै रोजी सकाळी १० वा. पैठण मतदारसंघातील बिडकीन येथे तर ११.३० वा.गंगापूर मतदारसंघात त्यांची शिवसंवाद यात्रा जाईल. आ.रमेश बोरणारे, आ. प्रदीप जैस्वाल. आ.संजय शिरसाट, आ.संदिपान भुमरे, आ.अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री शिंदे गटाशी हातमिळवणी केली आहे. जिल्ह्यात मागील साडेतीन दशकांत शिवसेनेला कधी नव्हे एवढे मोठे यश २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मिळाले होते. सध्या जिल्ह्यात शिवसेनेकडे फक्त कन्नडचे आ. राजपूत आहेत. लोकसभा व पाच विधानसभा मतदारसंघाचे गतवैभव मिळविण्यासाठी शिवसेनेला संघर्ष करावा लागणार आहे.