संत परंपरेला आधुनिकतेची जोड! पैठणमध्ये राज्यातील पहिला तीन मजली डिजिटल कीर्तन हॉल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 12:19 IST2025-09-02T12:18:20+5:302025-09-02T12:19:17+5:30
परंपरेला आधुनिकतेची जोड, राज्यातील पहिल्या पैठणच्या डिजिटल कीर्तन हॉलची १५०० आसन क्षमता

संत परंपरेला आधुनिकतेची जोड! पैठणमध्ये राज्यातील पहिला तीन मजली डिजिटल कीर्तन हॉल
- दादासाहेब गलांडे
पैठण : संत एकनाथ महाराजांच्या पुण्यभूमी असलेल्या पैठणनगरीत श्रद्धा आणि आधुनिकतेचा संगम साधणारा राज्यातील पहिलाच डिजिटल कीर्तन हॉल उभारला जात आहे. नाथ मंदिर परिसरात गोदावरीच्या पात्रालगत सुरू असलेल्या या प्रकल्पात तीन मजली गोलाकार गॅलरी, अद्ययावत ध्वनीप्रणाली, वातानुकूलन, डिजिटल एलईडी प्रोजेक्शनसह १५०० आसन क्षमतेचा भव्य कीर्तन हॉल तयार होणार आहे. या प्रकल्पाचे काम पुढील वर्षभरात पूर्ण होईल, अशी माहिती सां.बा. विभागाचे सहायक अभियंता राजेंद्र बोरकर यांनी दिली.
या कीर्तन हॉलची रचना बंगळुरू येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ध्यानसाधना केंद्राच्या धर्तीवर असून, सध्या ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे खासदार संदीपान भुमरे यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे. १०० फूट व्यास व ८० फूट उंच असलेली ही वास्तू केवळ कीर्तनासाठी नाही, तर नवोदित कीर्तनकारांसाठी प्रशिक्षण व सादरीकरणाची सुवर्णसंधी ठरणार आहे.
परंपरेला आधुनिकतेची जोड
नाथ मंदिर परिसरात भव्य दिव्य वास्तू निर्माण करण्याची खासदार संदीपान भुमरे यांची इच्छा होती. परंपरेला आधुनिकतेची जोड मिळाल्याने पैठणचे धार्मिक-सांस्कृतिक वैभव नव्या पर्वाकडे वाटचाल करेल.
- आमदार विलास भुमरे, अध्यक्ष, नाथ संस्थान
कीर्तनकारांसाठी पर्वणी
राज्यात आजपर्यंत कुठल्याही देवस्थानाने अशा प्रकारचा कीर्तन हॉल उभारलेला नाही. नवोदित कीर्तनकार व बाल वारकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार असून, ही वास्तू म्हणजे सेवा व साधनेचा अनोखा संगम आहे.
-हभप. विठ्ठलशास्त्री चनघटे