सखींच्या भेटीला येणार अभिनेता इरफान खान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:41 IST2017-11-06T00:40:13+5:302017-11-06T00:41:22+5:30
अभिनेता इरफान खान दि. ७ नोव्हेंबर रोजी ‘गप्पा-टप्पा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सखींच्या भेटीला येत आहे.

सखींच्या भेटीला येणार अभिनेता इरफान खान
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कसदार अभिनय आणि त्याला साजेसा दमदार आवाज यांच्या जोरावर स्वत:चा वेगळा चाहता वर्ग निर्माण करणारा, अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरलेला आणि प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कारप्राप्त अभिनेता इरफान खान दि. ७ नोव्हेंबर रोजी ‘गप्पा-टप्पा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सखींच्या भेटीला येत आहे. लोकमत हॉल, लोकमत भवन येथे सायं. ५.३० वा. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने सखींना इरफानशी संवाद साधण्याची, तसेच त्यांच्याबाबत अधिक जाणून घेण्याची संधी मिळेल. वेगळ्या धाटणीचा चित्रपट करणे हे नेहमीच इरफानचे वैशिष्ट्य राहिले आहे. बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्येही इरफानने स्वत:चे स्थान निर्माण केले असून, हॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करणा-या काही मोजक्याच भारतीय कलाकारांपैकी इरफान एक आहे.
‘करीब करीब सिंगल’ या अत्यंत नावीन्यपूर्ण विषयावर आधारित चित्रपटाच्या माध्यमातून इरफान लवकरच त्याच्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे. सखींनो या चित्रपटाविषयी आणि इरफानविषयी जाणून घेण्याची संधी न दवडता कार्यक्रमात आवर्जून सहभागी व्हा. ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. प्रवेश मागील गेटने.