छत्रपती संभाजीनगरात दिल्लीगेट ते हर्सूल टी पॉइंटपर्यंत २४५ मालमत्तांवर हातोडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 17:20 IST2025-07-08T17:13:44+5:302025-07-08T17:20:02+5:30
हिमायत बाग, आझाद महाविद्यालय, हडको कॉर्नरपर्यंत पाडापाडी

छत्रपती संभाजीनगरात दिल्लीगेट ते हर्सूल टी पॉइंटपर्यंत २४५ मालमत्तांवर हातोडा
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने रस्ता रुंदीकरण मोहिमेंतर्गत सोमवारी दिल्लीगेट ते हर्सूल टी पॉइंटपर्यंत २४५ मालमत्तांवर कारवाई केली. अडीच किमी अंतर असलेल्या या रस्त्यावर दोन्ही बाजूने पाच वेगवेगळ्या पथकांनी लहान मोठी अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली. दिल्लीगेट वगळता कुठेही तणावाची स्थिती नव्हती. मालमत्ताधारकांनी स्वत:हून आपले सामान काढून घेतले होते.
सोमवारी सकाळी महापालिकेचे १५०, पोलिसांचे १०० अधिकारी, कर्मचारी दिल्लीगेट येथील पेट्रोल पंपासमोर दाखल झाले. पंपासमोरील मनपाच्या खुल्या जागेला लागून असलेल्या अनधिकृत मालमत्तांवर अवघ्या अर्ध्या तासात कारवाई केली. जवळपास १० पेक्षा अधिक मालमत्ता जमीनदोस्त केल्या. पथक थोडे पुढे सरकले. दिल्लीगेटच्या उजवीकडील मालमत्तांवर दोन ते तीन मजली इमारतींवर जेसीबी, पोकलेन लावण्यात आला. हळूहळू तणाव वाढत गेला. बघ्याची गर्दीही हजारोंच्या आसपास होती. पोलिसांनी अनेकदा काठ्या उगारताच नागरिक सैरावैरा पळू लागले. पाच मिनिटांनंतर परत तीच परिस्थिती निर्माण होत होती. याचवेळी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागविण्याचा निर्णय मनपा, पोलिस अधिकाऱ्यांनी घेतला. तीन मजली जिमच्या मालकाने इमारत अधिकृत करण्यासाठी मनपाकडे अर्ज केला होता. गुंठेवारीसाठी १० लाखांचा धनादेश मनपा अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. त्यानंतरही मनपा अधिकाऱ्यांनी जिमच्या दर्शनी भागाची मोठी तोडफोड केली. शेजारील ४ मालमत्तांवर अशीच कारवाई करण्यात आली.
मनपाच्या उर्वरित पथकांनी पुढे हिमायत बाग, मौलाना आझाद महाविद्यालयासमोरील लहान मोठी दुकाने, हॉटेल, सलून, चहा कॉफी विक्रीच्या दुकानांवर कारवाई केली. ताज हॉटेलच्या समोरील एका खुल्या जागेवरील पत्रेही काढून टाकले. हडको कॉर्नर चौक ते जटवाडा रोड कॉर्नरपर्यंतची लहान मोठी अतिक्रमणे, संरक्षण भिंती, छोटी-छोटी दुकाने जमीनदोस्त करून रस्ता मोकळा करण्यात आला.
आज हर्सूल टी पॉइंट ते वसंतराव नाईक चौक
१) मंगळवारी सकाळी महापालिका आणि पोलिस हर्सूल टी पॉइंट येथून कारवाईला सुरुवात करणार आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूची अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे पाडण्यात येतील.
२) रस्ता ६० मीटर म्हणजेच २०० फूट रुंद आहे. मागील दोन दिवसांपासून या भागातील व्यापारी, मालमत्ताधारक आपली अतिक्रमणे स्वत:हून काढून घेत आहेत.
३) कारवाईचा शेवट सिडको बसस्थानकातील वसंतराव नाईक चौकात करण्यात येणार आहे. मंगळवारीही पोलिस बंदोबस्त अधिक तैनात करण्यात येणार आहे.