मानवत तालुक्याचा दुष्काळ निवारणासाठी ३ कोटीचा कृती आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 19:44 IST2018-12-17T19:15:56+5:302018-12-17T19:44:14+5:30
हा अहवाल मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती गट विकास अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मानवत तालुक्याचा दुष्काळ निवारणासाठी ३ कोटीचा कृती आराखडा
मानवत (परभणी ) : तालुक्यात येत्या काळात भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे भविष्यात उद्भवणारी पाणी टंचाई दुर करण्यासाठी पंचायत समितीने सहा महिन्यासाठी २ कोटी ९४ लाख रुपयांचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. हा अहवाल मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती गट विकास अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तालुक्यात पावासाचे प्रमाण कमी झाल्याने नोव्हेंबरपासुनच टंचाईचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत तीन ते चार गावातील विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव आले असुन मंजुरीसाठी दाखल करण्यात आले आहेत. पाण्याची सद्यस्थिती आणि व पुढील काळाची स्थिती लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने १ जानेवारी ते ३० जुन २०१९ या सहा महिन्यासाठी पुरक पाणी टंचाई कृती आराखडा तयात केला आहे. हा अहवाल वरिष्ठ स्तराकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी डी . बी. घुगे यांनी दिली आहे.
अशी आहे तरतूद
१ जानेवारी ते ३१ मार्चसाठी टॅंकर व बैलगाडीद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी २१ गावासाठी ७८ लाख रुपये, खाजगी विहीर व बोअर अधिग्रहण करण्यासाठी ४९ गावासाठी ८७ प्रस्ताव सादर केले आहेत. यासाठी ३१ लाख ३२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. नळ योजना विशेष दुरुस्ती २७ गावासाठी ३२ लाख ३५ हजार रुपये खर्च प्रस्तावित केला आहे. जानेवारी ते मार्च साठी असा एकुण १ कोटी ८५ लाख ६७ हजार तर एप्रिल ते जुन या तीन माहिन्यासाठी २१ गावासाठी बैलगाडी व टॅंकर ने पाणी पुरवठा करण्यासाठी ७८ लाख रुपये, खाजगी विहीर व बोअर अधिग्रहणासाठी ३१ लाख ३२ हजार रुपये असा सहा महिन्यासाठी २ कोटी ९४ लाख रुपये संभाव्य खर्च अपेक्षीत असल्याचा कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे.
अहवाल मंजुरीसाठी पाठवला
जानेवारी ते जुन २०१९ पर्यंत संभाव्य पाणी टंचाई कृती आरखडा तयार करण्यात आला असुन मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
डी . बी. घुगे, गटविकास अधिकारी मानवत