कोरोनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहा कोचिंग क्लासेसवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 15:29 IST2021-02-20T15:27:33+5:302021-02-20T15:29:55+5:30
सहा ठिकाणी कोरोनासंदर्भात उपाय-योजना नसल्याचे व नियम पाळले जात नसल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

कोरोनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहा कोचिंग क्लासेसवर कारवाईचा बडगा
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग शहरात झपाट्याने वाढत आहे. नागरिक, खाजगी संस्थांकडून नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी मंगल कार्यालये व कोचिंग क्लासेसवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारपासून तपासणी सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी सहा कोचिंग क्लासेस चालकांवर कारवाई करून २६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढत आहे. शुक्रवारी दिवसभरात तब्बल १५६ रुग्णांची भर पडली. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे महापालिकेने नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रमांसाठी फक्त ५० व्यक्तींना परवानगी असताना शेकडो जणांच्या उपस्थितीत कार्यक्रम होत आहेत. शहरातील कोचिंग क्लासेस मध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटाझरचा वापर या नियमांचे पालन होते किंवा नाही, याची तपासणी करण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहेत. शुक्रवारपासून या पथकांमार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे.
दिवसभरात ४३ शिकवण्यांची तपासणी करण्यात आली. यातील सहा ठिकाणी कोरोनासंदर्भात उपाय-योजना नसल्याचे व नियम पाळले जात नसल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पथक क्रमांक पाचने चार ठिकाणी कारवाया करून प्रत्येकी पाच हजारांचा तर पथक क्रमांक चारने एका शिकवणीकडून पाच हजार तर दुसऱ्याकडून एक हजार असा २६ हजारांचा दंड वसूल केल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
मंगल कार्यालयांना नोटिसा
शिकवण्यांप्रमाणेच नियम न पाळणाऱ्या मंगल कार्यालयांवर कारवाई केली जाणार आहे. त्यानुसार वॉर्डनिहाय मंगल कार्यालयांना ५० जणांची उपस्थिती ठेवणे अनिवार्य आहे. या ठिकाणी सुद्धा सोशल डिस्टन्स, मास्क वापरणे बंधनकारक आहे. नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना नोटीस देऊन केल्या जात असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.