फसवणूक प्रकरणात ११ वर्षापासून फरार आरोपी गुन्हे शाखेने पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 18:57 IST2021-06-01T18:55:57+5:302021-06-01T18:57:08+5:30
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली.

फसवणूक प्रकरणात ११ वर्षापासून फरार आरोपी गुन्हे शाखेने पकडला
औरंगाबाद: बनावट कागदपत्राच्या आधारे निवडणूक आयोगाचे बनावट मतदार कार्ड तयार करून फसवणूक केल्याच्या गुंह्यात २००९ पासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली.
संतोष साहेबराव मिसाळ(३२, रा. चौधरी कॉलनी, चिकलठाणा ) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी संतोषसह सुमारे ३० जणाविरुध्द बनावट मतदार कार्ड बनविल्याचा गुन्हा २००९ साली सिटीचौक ठाण्यात दाखल झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. मात्र आरोपी न्यायालयात हजर होत नसल्याने न्यायालयाने त्याला फरारी घोषित केले होते. ही बाब गुन्हे शाखेला प्राप्त झाल्यावर पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, फौजदार विठ्ठल चासकर आणि कर्मचाऱ्यांनी त्याचा शोध घेतला.
यावेळी संतोष मिसाळ वाळूज एमआयडीसी मधील कंपनीत कामाला जात असल्याचे समजले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध असलेली पुरावे आणि दोन मतदार कार्ड, जुना त्याचा फोटो त्याच्यासमोर ठेवला तेव्हा तो निरुत्तर झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सिटीचौक पोलिसांच्या स्वाधीन केले.