‘तो’ आरोपी होता शहरातच, मात्र पोलिसांना सापडला ४१ वर्षांनंतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 11:58 IST2021-02-12T11:55:56+5:302021-02-12T11:58:15+5:30
तेव्हा तब्बल ४१ वर्षांपूर्वीच्या केसमध्ये पोलीस अटक करण्यासाठी आल्याचे समजल्याने आरोपी आश्चर्यचकित झाले.

‘तो’ आरोपी होता शहरातच, मात्र पोलिसांना सापडला ४१ वर्षांनंतर
औरंगाबाद : सीटी चौक पोलीस ठाण्यात १९८० साली फसवणूक प्रकरणात अटक केलेला व जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याला कोणीही काहीही विचारले नाही. तो न्यायालयात जायचा, मात्र केस बंद झाल्याचे समजल्यावर तो बिनधास्त राहत होता. फरारी (वॉण्टेड) यादीत त्याचे नाव असल्याचे ४१ वर्षांनंतर पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर शोध घेऊन पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची रवानगी हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत केली.
महेमूद खान हसन खान (रा. जाधववाडी) असे आरोपीचे नाव आहे. सुनावणीला हजर न राहणाऱ्या आरोपीविरुध्द न्यायालय प्रथम तीन समंस काढते. या समंसना प्रतिसाद न मिळाल्यास अटक वारंट काढले जाते. पोलीस त्या वॉरंटनुसार आरोपीचा शोध घेतात. बऱ्याचदा आरोपी त्यांचा राहण्याचा पत्ता बदलून नवीन ठिकाणी राहण्यास जातात. ही बाब पोलिसांना कळत नाही. यामुळे पोलिसांना वॉरंटची तामिली करता येत नाही. आरोपी सापडत नाही, असा अहवाल पोलिसांनी न्यायालयास पाठविल्यावर न्यायालय त्या आरोपीविरुध्दचा खटला प्रलंबित ठेवून आरोपीला फरार घोषित करते. त्यानुसार महेमूदला त्याच्याविरुध्दच्या खटल्यात फरार घोषित करण्यात आले होते. त्याचे नाव फरारी आरोपींच्या यादीत होते.
उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी एक सेल स्थापन केला. या सेलमार्फत मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, फौजदार अमोल देशमुख यांच्या पथकाने महेमूदचा शोध घेतला. तेव्हा तब्बल ४१ वर्षांपूर्वीच्या केसमध्ये पोलीस अटक करण्यासाठी आल्याचे समजल्याने महेमूद आश्चर्यचकित झाले. मी याच शहरात राहतो. अनेकदा सिटी चौक ठाण्यात आणि न्यायालयात गेलो, मात्र केस बंद झाल्याचे आपल्याला सांगण्यात आले होते, असे महेमूद म्हणाले. गुन्हे शाखेने महेमूद यांना सिटी चौक पोलिसांच्या ताब्यात दिले. सिटी चौक पोलिसांनी आरोपी महेमूदला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आणि हर्सूल कारागृहात रवानगी केली.
२७ वर्षांपासून फरार चोर पकडला
२७ वर्षांपूर्वी सिडको एन ३ येथील महेंद्र दिलीपचंद कोठारी यांचे घर फोडल्याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपी शंकर बन्सी साखळे हा फरार होता. गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक योगेश धोंडे यांनी त्याला तीसगाव परिसरातील खवड्या डोंगराजवळ अटक केली. या केसमध्ये त्याचे तीन साथीदार होते.