पोलिसाला पाठीशी घातल्याचा आरोप़़़
By Admin | Updated: May 9, 2015 00:54 IST2015-05-09T00:47:15+5:302015-05-09T00:54:16+5:30
लातूर : पोलिस कर्मचाऱ्याने दिलेल्या दुचाकीच्या धडकेत लातूरच्या सोना नगर भागातील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी

पोलिसाला पाठीशी घातल्याचा आरोप़़़
लातूर : पोलिस कर्मचाऱ्याने दिलेल्या दुचाकीच्या धडकेत लातूरच्या सोना नगर भागातील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी व समाज बांधवांनी शुक्रवारी पोलिस यंत्रणेवर रोष व्यक्त केला़ पोलिस कर्मचाऱ्यावर मरणास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्याचे एमआयडीसी ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर मयताच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी खाडगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.
पोलिस मुख्यालयातील कर्मचारी प्रेमसिंग राजपूत हे त्यांच्या कुटुंबातील चौघा सदस्यांसह २६ एप्रिल रोजी एमआयडीसी भागातून जात होते़ याचवेळी सोना नगर (कुलस्वामीनी नगर) भागातील लाँड्रीचा व्यवसाय करणारे युवराज लक्ष्मण विहिरे (वय ५०) हे त्यांच्या पत्नीसह दुचाकीवर बसून जात असताना २६ एप्रिल रोजी सायंकाळी ७़३० वाजता एमआयडीसीतील विश्रामगृहासमोर दोघांच्या दुचाकीची समोरासमोर टक्कर झाली़ या अपघातात युवराज विहिरे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांच्यावर लातूरच्या औसा रोडवरील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते़ उपचार सुरु असताना त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, ७ मे रोजी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला़ याबाबत ६ मे रोजी एमआयडीसी पोलिसात नोंद आहे.
या घटनेची माहिती समाज बांधवांना कळाल्यानंतर त्यांनी घटनेचा व परिस्थितीचा मागोवा घेतला़ त्यानंतर मयताच्या नातेवाईकांनी व समाज बांधवांनी ८ मे रोजी सकाळी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून मयताच्या अपघाताची नोंद करण्यामध्ये पक्षपात झाल्याचा आरोप करीत तेथील अधिकाऱ्यांना धारेवर धरले़ २६ एप्रिल ते ७ मे या कालावधीत एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेताना पक्षपात केला असल्याचा आरोप शुक्रवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात जमलेल्या समाज बांधवांनी केला़ तसेच पोलिस कर्मचाऱ्याच्या दुचाकी बाबत योग्य शहानिशा झाली नसल्याचे काही जणांचे म्हणणे होते़ तपासीक पोलिसांनी अपघाताला जबाबदार असणाऱ्या पोलिसाला पाठीशी घालत असल्याचा आरोपही उपस्थितांनी केला़ यावेळी एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक यु़एऩ घुले यांनी समाजबांधवांशी बोलून मरणास कारणीभूत ठरल्याचे कलम दाखल करण्यात येईल, असे सांगितल्यानंतर नातेवाईकांनी मयत युवराज विहिरे यांच्या पार्थिवावर खाडगाव येथील स्मशानभूमीत शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार केले़