आयएसओ मानांकन मिळालेल्या आळंदच्या आरोग्य केंद्राला रिक्त पदांचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:05 IST2021-07-03T04:05:26+5:302021-07-03T04:05:26+5:30
आरोग्य केंद्राला रिक्त पदांचे ग्रहण सुविधांचा अभाव : रुग्णांची होऊ लागली गैरसोय, ज्ञानेश्वर चोपडे आळंद : फुलंब्री तालुक्यातील आळंद ...

आयएसओ मानांकन मिळालेल्या आळंदच्या आरोग्य केंद्राला रिक्त पदांचे ग्रहण
आरोग्य केंद्राला रिक्त पदांचे ग्रहण
सुविधांचा अभाव : रुग्णांची होऊ लागली गैरसोय,
ज्ञानेश्वर चोपडे
आळंद : फुलंब्री तालुक्यातील आळंद येथील आयएसओ पुरस्कारप्राप्त प्राथमिक आरोग्य केंद्राला रिक्त पदांचे ग्रहण अद्यापही कायम असून कायमस्वरूपी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसहित कर्मचाऱ्यांची दहा पदे रिक्त आहेत. त्याचा रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे.
आळंद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत चार उपकेंद्रांचा समावेश असून सोळा गावातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविल्या जात आहेत. त्याचबरोबर येथून गेलेल्या महामार्गावर वाहनांची संख्या जास्त असल्याने येथे अनेक छोट्या-मोठ्या अपघातातील जखमींना हे रुग्णालय महत्त्वाचे आहे. आरोग्य केंद्रात औषधी साठा मुबलक उपलब्ध असल्याने दररोज जवळपास दीडशे ते दोनशे रुग्ण येथे उपचारासाठी येतात. त्यात कोरोनाचे सावट कायम असल्याने प्रत्येक गावातील नागरिकांची तपासणी, लसीकरण यासाठी आरोग्य कर्मचारी कमी पडू लागले आहेत. मनुष्यबळाची कमतरता असल्याने रुग्णसेवा कोलमडली आहे. परिणामी आशा सेविका, गटसेविका, गटप्रवर्तक यांची मदत घ्यावी लागत आहे.
अशी आहेत रिक्त पदे
आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकारी हे प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने आहे त्या परिस्थितीत या डॉक्टरांना वैद्यकीय सेवा द्यावी लागत आहे. येथील केंद्रात कायमस्वरूपी दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त करणे, आरोग्य सेविका- ०२, शिपाई- २, प्रयोगशाळा तंत्रज्ञ- १ यांचा समावेश आहे. तर उपकेंद्र गेवराई गुंगी : आरोग्य सेविका- १, उपकेंद्र खामगाव आरोग्य सेविका- १, गुंगी आरोग्य सेवक- १, उपकेंद्र खामगाव - आरोग्य सेवक- १.
----
शवविच्छेदन कक्ष बंदच
आरोग्य केंद्रातील शवविच्छेदन कक्ष सुरुवातीपासून बंद अवस्थेत असल्याने आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या गावात काही दुर्घटना होऊन मयत झालेल्या रुग्णांचे शवविच्छेदन करण्यासाठी नातेवाइकांना मृतदेह फुलंब्री किंवा औरंगाबाद येथील रुग्णालयात घेऊन जावा लागतो. नातेवाइकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.
010721\img-20190619-wa0011.jpg
फोटो ओळ-आळंद(ता.फुलंब्री)येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत.