लेखक घडविणारा लेखक! रा. रं. बोराडे नवलेखकांसाठी होते संस्काराचे ‘लोकविद्यापीठ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 14:47 IST2025-02-11T14:46:13+5:302025-02-11T14:47:10+5:30

मराठवाड्याचे भूमीपुत्र, प्रख्यात लेखक तथा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष प्राचार्य रा.रं.बोराडे यांचे निधन झाले. त्यांचे लेखन आणि नव लेखकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व याचा आढावा घेणारा विशेष लेख

A writer who creates writers! Principal R. R. Borade was a 'people's university' of culture for new writers | लेखक घडविणारा लेखक! रा. रं. बोराडे नवलेखकांसाठी होते संस्काराचे ‘लोकविद्यापीठ’

लेखक घडविणारा लेखक! रा. रं. बोराडे नवलेखकांसाठी होते संस्काराचे ‘लोकविद्यापीठ’

- प्रा. डॉ. गणेश मोहिते ( उपप्राचार्य, देवगिरी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर

प्राचार्य रा. रं. बोराडे यांचा आधुनिक मराठी ग्रामीण साहित्याचे दालन समृद्ध करण्यात मोठा वाटा आहे. २५ डिसेंबर १९४० साली लातूर जिल्ह्यातील 'काटगाव' सारख्या छोट्याश्या गावात एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. काटगाव येथे चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी गावं सोडले. माढा, बार्शी, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर अशा शहरातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. नोकरीच्या निमिताने वास्तव्य नागरी भागात होते; तरी मराठवाड्यातील ग्रामीण जीवनाने व तिथल्या ऋतूचक्राने घडविलेला त्यांचा मन:पिंड कायम राहिला. 

१९५७ साली त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. तिथंपासून ते गत दोन वर्षांपर्यंत त्यांचा सृजनात्मक लेखनप्रवास अविरत चालू होता. प्रदीर्घ लेखनकाळ हे वाड्मयविश्वातील अपवादभूत उदाहरण आहे. १९६२साली आलेल्या ‘पेरणी’ ते ‘ताळमेळ’, ‘मळणी’, ‘वाळवण’, ‘राखण’, ‘गोधळ’, ‘माळरान’, ‘बोळवण’, ’वरात’, ‘फजितवाडा’, ‘खोळंबा’, ‘बुरुज’, ‘नातीगोती’, ‘हेलकावे’, ‘कणसं आणि कडबा’ यासारख्या कथासंग्रहातून त्यांनी  मराठवाडी कष्टकऱ्यांच्या दु:खाला भाषिक आविष्कारातून सार्थ वाचा फोडली. त्यांची कथाकार ही ‘नाममुद्रा’ ठळक झाल्यानंतर एकाच वाडमयप्रकारात ते रमले नाहीत. कादंबरी, नाट्य, विनोदी, समीक्षा, बालसाहित्य अशा बहुअंगी लेखनातून ग्रामसमूहातील माणसं त्यांची ‘नातीगोती’, त्यातील ‘मरणकळा’, ‘शिवारा’ बाहेरील ‘पाचोळा’गत त्यांचे अस्तित्व, सतत ‘माळराना’वर जीवघेणे कष्ट उपसूनही कृषक समाजाच्या नशिबी आलेले ‘रिक्त-अतिरिक्त’पण. कितीही ‘पेरणी’ आणि ‘मळणी’ केली तरी ‘चारापाणी’ याचे ‘सावट’ डोक्यावर नित्याचेच. अगदी इथल्या स्त्रीच्या नशिबी आमदारपद आलं तरिही ती ‘आमदार सौभाग्यवती’ राहील हे सांगणे तसे  कठीणच! म्हणून शेवटी ‘कश्यात काय आणि फाटक्यात पाय’ असं म्हणत नियतीचा दु:खभोग म्हणून जगू पाहणारी या दुष्काळी प्रदेशातील माणसं त्यांच्या उभ्याआडव्या सांस्कृतिक परिप्रेक्ष्यासह मराठवाडी बोलीतून त्यांनी आविष्कृत केली. हे त्यांचे योगदान लक्षणीय होय. त्यांनी विशुद्ध कलावादी भूमिका ओलांडून पुढे टोकदार सामाजिक प्रश्न व समाजातील ज्वलंत वास्तव अभिव्यक्त केले आहेत.  

मराठवाडी माणसे, स्त्रीशोषण, कौटुंबिक ताणतणाव, गरिबी, दुष्काळ, शेतीभाती, निसर्ग, देव, दैवते, श्रद्धा-अंधश्रद्धा, ग्रामपरंपरा, नातीगोती आणि त्यातील राजकारण, माणसांचे बेरकीपण त्यांच्या स्वभावधर्मासह रेखाटन हा त्यांच्या विविधांगी लेखनाचा स्थायीभाव होता. त्यांची पाचोळा’ही कलाकृती तर अद्वितीय. यांत्रिकीकरणाच्या अनाकलनीय, वेगवान, अटळ कचाट्यात सापडलेला पारंपारिक, रूढी ग्रस्त गरीब, शोषिक असह्य स्त्रीचे मनोविश्व तिच्यातून प्रभावीपणे व्यक्त झाले आहे. वेगवेगळ्या प्रसंगी उद्भवणाऱ्या सर्व ताणताणावांचा दाब ग्रामीण कुटुंबातील स्त्रीला सोसवा लागतो, त्यात तिचा कोंडमारा होतो. परंतु अशा यातनामय प्रसंगातून तिची जगण्याची जिद्द, आंतरिक सामर्थ्य उजळून निघालेले दिसते, असे मौलिक आशयसूत्र घेऊन आलेली ही कादंबरी वाचकांना आजही आपली वाटते.

गेली सहा-साडेसहा दशकं वाडमयव्यवहार हे ‘जीवित’ मानून वाडमयसेवा करणारे ते ‘तपस्वी’ होते. नव्या पिढीच्या लेखनाबाबत आस्थेने बोलणारे, वाचणारे आणि त्यातील शक्तीस्थळे मोठ्या मनाने मान्य करणारे बोरडे यांच्यासारखे लेखक आजच्या काळात दुर्मिळ झालेत. गाव-खेड्यातील नंतरच्या पिढ्या त्यांच्याकडे पाहून लिहित्या झाल्या ही बाब नाकरता येत नाही. त्यांनीही या पिढ्यांना आस्थेने जोडून घेतले. शेतकरी समाज व संस्कृती तसेच आज विकलांग होत जाणारी कृषकव्यवस्था, कृषिकेंद्रित समूहांचे प्रश्न हे त्यांच्या चिंतनाचा, आस्थेचा आणि सृजनाचा कायम केंद्रबिंदू राहिला होता. ग्रामीण साहित्य आणि ग्रामीण साहित्य चळवळ वृद्धींगत करण्यात त्यांचा मौलिक सहभाग राहिला आहे. ते फक्त लिहित नव्हते तर लिहित्या हाताना ‘बळ’ देत होते; हे आम्ही पाहिले आहे. ‘शेतकरी साहित्य पुरस्कार’ हे त्याचे एक उदाहरण आहे. यांसाठीच तर आम्ही त्यांना ‘लेखक घडविणारा लेखक’ मानतो आणि ते सर्वमान्य आहे.

त्यांच्या वाडमयीन कार्याचा महाराष्ट्र शासन, सर्व साहित्य संस्थांसह विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्थांनी पुरस्कार व सन्मानांनी वेळोवेळी गौरव  केलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठीय अभ्यासक्रमात त्यांचे लेखन समाविष्ट झाले. याचबरोबर जून १९८९ मध्ये हिंगोली येथे भरलेल्या १७ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदांसह विविध ग्रामीण तसेच इतर अनेकविध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद याबाबत त्यांची भूमिका महाराष्ट्र जाणतोच.

त्यांनी आमच्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात काही काळ अध्यापनकार्य केल्यानंतर प्रशासकीय कौशल्य पाहून  संस्थेने अल्पावधीतच वैजापूर स्थीत विनायकराव पाटील महविद्यालयाच्या प्राचार्यपदी त्यांची निवड केली होती. ते महाविद्यालय वाड्मयीन चळवळीचे केंद्र म्हणून अनेक वर्ष राज्याभर चर्चेत होते, ते त्यांच्या उपक्रमशीलतेमुळेच. पुढे छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालय, परभणीचे शिवाजी महाविद्यालयांत प्राचार्य म्हणून त्यांनी सेवा दिली. तसेच अनेक  संस्था, विद्यापीठे व महाराष्ट्र शासनाच्या बहुविध समितीचे सदस्य म्हणून त्यांचे कार्य विदित आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी असतांना त्यांचे केलेले कार्य दृष्टेपणाचे होते. आधुनिक साहित्यात ज्यांनी ‘अक्षर’ लेखनाने आपली 'नाममुद्रा' इतिहासावर कोरली त्या नामवंताच्या मालिकेत ते आज विभुषित आहेत. समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय या लोकशाही मूल्यांच्या प्रस्थापनेसाठीचे त्यांचे वाडमयीन कार्य नव्या पिढीला प्रेरक आहे. ते आमच्यासाठी संस्काराचे ‘लोकविद्यापीठ’ होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

Web Title: A writer who creates writers! Principal R. R. Borade was a 'people's university' of culture for new writers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.