भाजीपाला विक्रेत्यास लिफ्ट देत लुटले, रामनगर चौकातील घटना
By राम शिनगारे | Updated: April 18, 2023 20:49 IST2023-04-18T20:48:52+5:302023-04-18T20:49:57+5:30
एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

भाजीपाला विक्रेत्यास लिफ्ट देत लुटले, रामनगर चौकातील घटना
छत्रपती संभाजीनगर : पहाटे रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या भाजीपाला विक्रेत्यास दुचाकीवरील दोघांनी लिफ्ट दिली. मात्र, दुचाकीवर बसताच अंधारात नेऊन मारहाण करीत लुटल्याचा प्रकार १७ एप्रिलच्या पहाटे पाच वाजता रामनगर चौकात घडला. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
भाजीपाला विक्रेते शहाजी एकनाथ साळुंके (६५, संजयनगर, गल्ली नंबर ४, मुकूंदवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी पहाटे चिकलठाणा येथे जाण्यासाठी रामनगर चौकाच्या पुढील सह्याद्री हॉस्पीटलसमोर रिक्षाची वाट पाहत उभे होते. तेव्हा दुचाकीवर दोघेजण त्याठिकाणी आले. त्यांनी शहाजी यांच्याजवळ दुचाकी थांबत ‘बाबा तुम्हाला नेऊन सोडतो’ म्हणत दुचाकीवर बसविले.
मात्र त्या दोघांनी दुचाकी धूत हॉस्पीटलसमोरील अंधारात नेली आणि वृद्धाला मारहाण करत खाली पाडून त्यांच्या खिशातील तीन हजार रुपये काढून घेतले. त्याशिवाय त्यांच्या गळ्यातील नऊ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे बदाम, १ हजार १०० रुपयांचा मोबाईल असा १३ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून दोघा चोरट्यांनी पोबारा केला. गुन्हा नोंदविल्यानंतर अधिक तपास उपनिरीक्षक अर्जुन राऊत करीत आहेत.