स्थापत्यशैलीचा अनोखा नजारा; वेरूळ लेणीतील गौतम बुद्धांच्या मूर्तीवर किरणोत्सव सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 20:09 IST2025-03-10T20:00:07+5:302025-03-10T20:09:08+5:30
किरणोत्सव सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाल्याने अखेर खुलताबाद पोलीसांना लेणी परिसरात बंदोबस्त तैनात करावा लागला.

स्थापत्यशैलीचा अनोखा नजारा; वेरूळ लेणीतील गौतम बुद्धांच्या मूर्तीवर किरणोत्सव सोहळा
खुलताबाद: जगप्रसिद्ध वेरूळ दहा नंबरच्या लेणीतील तथागत गौतम बौद्धांच्या मूर्तीवर किरणोत्सव सोहळा हजारो पर्यटकासह भाविकांना आज सोमवार दि १० रोजी सांयकाळी ४:१० मिनिटांनी अनुभवयास मिळाला. सदरील सोहळा बघण्यासाठी हजारो पर्यटक व भाविकांनी दुपार पासूनच लेणी परिसरात गर्दी केली होती.
स्थापत्य कलेचा अद्धभुत नमूना असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये एकूण चौतीस लेण्या आहेत. यामध्ये बारा बौद्ध धर्मिय लेण्या आहेत. तर यातील दहा नंबरची बौद्ध लेणी ही चैत्य तर बाकीच्या बौद्ध लेणी या विहार आहेत. यातील दहा नंबरच्या बौद्ध लेणीमध्ये सूर्य उत्तरायणला जात असताना सूर्यकिरणे येत असतात. दरवर्षी १० मार्च रोजी सूर्यकिरणे तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीच्या चेहऱ्यावरती येतात. आगामी पाच ते सहा दिवस हा सोहळा भाविकांसह पर्यटकांना अनुभवता येईल.
महाराष्ट्रातील बौद्ध लेणीतील हा शेवटचा चैत्य असून हा महायानास समर्पित आहे. तर यामध्ये वज्रयाणाची काही शिल्पे पहावयास मिळतात. यालाच सुतार की झोपड़ी किंवा विश्वकर्मा मंदिर ही म्हणतात. गुहेत प्रवेश केल्याबरोबरच भगवान बुद्ध बोधीवृक्षाखाली ( पिंपळ ) बसलेले दिसत असून धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत बघायला मिळतात. भगवान बुद्धाच्या उजव्या हाताला बोधिसत्व पद्मपाणी व डाव्या हातास बोधिसत्व वज्रपाणी पहावयास मिळतात. तर मागच्या बाजूस स्तूप आहे. लेणीतील छतास गज पृष्ठाकृती आकार दिलेला दिसून येतो. तर समोरच वाद्य मंडप दिलेला असून पूर्वीच्या काळी या ठिकाणी ढोल वाजवून सकाळी व संध्याकाळी बुद्ध वंदनेस बोलविण्याची प्रथा होती.
जगप्रसिद्ध वेरूळ लेणीत स्थापत्य शैलीचा अनोखा नजारा; गौतम बुद्धांच्या मूर्तीवर किरणोत्सव सोहळा #AjanthaEllora#chhatrapatisambhajinagar#marathwadapic.twitter.com/Ll2rNJ0HQU
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) March 10, 2025
इतिहास अभ्यासक डॉ. संजय पाईकराव, अशोक नगरे, सुरज जगताप, डॉ. सोनाली म्हस्के, अरविंद जोगदंड, प्राचार्य गायकवाड, सुनिल खरे, दिपक गायकवाड, डॉ. राहुल बचाटे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि भाविक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. दरम्यान, सदरील किरणोत्सव सोहळा बघण्यासाठी मोठी गर्दी झाल्याने या ठिकाणी खुलताबाद पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.