खरा रक्षक! छत्रपती संभाजीनगरात पोलिस अंमलदाराने सीपीआर देत भाजीविक्रेत्याचे वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 15:34 IST2025-03-12T15:33:50+5:302025-03-12T15:34:26+5:30

पोलीस आयुक्तालयात काही दिवसांपुर्वी पोलिस अंमलदार व अधिकाऱ्यांना डॉक्टर व तज्ञांकडून प्राण वाचवण्याबात प्राथमिक प्रशिक्षण दिले होते.

A true protector! A police officer in Chhatrapati Sambhajinagar saved the life of a vegetable vendor by administering CPR | खरा रक्षक! छत्रपती संभाजीनगरात पोलिस अंमलदाराने सीपीआर देत भाजीविक्रेत्याचे वाचवले प्राण

खरा रक्षक! छत्रपती संभाजीनगरात पोलिस अंमलदाराने सीपीआर देत भाजीविक्रेत्याचे वाचवले प्राण

छत्रपती संभाजीनगर : संकटात असलेल्यांचे पोलिस प्राण वाचवतात. मात्र, प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतरही पोलिस मदतीला धावून येत खऱ्या रक्षकाची भूमिका पार पाडतात, याचे उदाहरण मंगळवारी साताऱ्यात पहायला मिळाले. भाजी विकताना अचानक हदृयाचा तीव्र झटका आलेल्या विक्रेत्याच्या मदतीला एक पोलिस अंमलदार डॉक्टरच्या रुपात धावून आले.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष कार्यालयात कार्यरत अंमलदार रामदास बबनराव गव्हाणे हे सातारा परिसरात राहतात. ११ मार्च रोजी दुपारी ते घरुन कार्यालयाच्या दिशेने जात होते. दुपारी १.३० वाजता रेणुका माता मंदिर परिसरातील मुख्य रस्त्यावर भाजी विक्रेते रामकिसन श्रीधरराव सुलक्षणे (40, रा. पेशवे नगर) यांना अचानक हृदयाचा तीव्र झटका आला. ते अचानक बेशुध्द पडल्याने आसापासचे विक्रेते, त्यांच्या कुटूंबातील सदस्य पुरते घाबरुन गेले. कोणाला बोलवावे, काय करावे काहीच सुचत नसताना गव्हाणे यांना आरडाओरड ऐकू आला. दुचाकी थांबवून त्यांनी सुलक्षणे यांच्याकडे धाव घेतली. त्यांना दृदयाचा झटका आल्याचे लक्षात येताच गव्हाणे यानी सुलक्षणे यांच्या छातीवर दाब देत सीपीआर दिला. थांबलेला श्वास काहीसा सुरू झाल्याचे लक्षात येताच सुलक्षणे यांना गव्हाणे यानी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी देखील तत्काळ उपचार सुरू केले. परिणामी, गव्हाणे यांच्या छोट्याश्या कृतीने मात्र एका गरीब भाजीविक्रेत्याचे प्राण वाचले. पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी गव्हाणे यांचा त्यांच्या या कृतीसाठी सत्कार करुन कौतुक केले.

प्रशिक्षण कामी आले
पोलीस आयुक्तालयात काही दिवसांपुर्वी पोलिस अंमलदार व अधिकाऱ्यांना डॉक्टर व तज्ञांकडून प्राण वाचवण्याबात प्राथमिक प्रशिक्षण दिले होते. यात प्रामुख्याने छाती संबंधित प्रकरणात सीपीआर कसा द्यावा, तोंडावाटे श्वास कसा पुरवावा, याचेही प्रशिक्षण दिले होते. ते मंगळवारी कामी आल्याची प्रतिक्रिया गव्हाणे यांनी दिली.

Web Title: A true protector! A police officer in Chhatrapati Sambhajinagar saved the life of a vegetable vendor by administering CPR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.