वरिष्ठांच्या आदेशानंतर छत्रपती संभाजीनगर मनपासाठी भाजपची रिपाइंसोबत चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 15:56 IST2025-12-18T15:54:44+5:302025-12-18T15:56:10+5:30
भाजपकडून निमंत्रण येत नसल्यामुळे रिपाइंने नाराजी व्यक्त केली होती.

वरिष्ठांच्या आदेशानंतर छत्रपती संभाजीनगर मनपासाठी भाजपची रिपाइंसोबत चर्चा
छत्रपती संभाजीनगर : भाजपने मंगळवारी शिंदेसेनेसोबत युतीच्या अनुषंगाने प्राथमिक चर्चा केल्यानंतर बुधवारी रिपाइं आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत युतीबाबत चिकलठाणा येथील पक्ष कार्यालयात चर्चा केली. रिपाइं देखील युती सोबतच राहणार असल्याचा दावा बैठकीअंती करण्यात आला. भाजपकडून निमंत्रण येत नसल्यामुळे रिपाइंने नाराजी व्यक्त केली होती. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होऊ देऊ नका, असे राज्याच्या वरिष्ठ नेत्यांकडून आदेश आल्यानंतर भाजपने महायुतीतील घटक पक्षासोबत चर्चेस सुरुवात केली.
बैठकीत रिपाइंचे प्राबल्य असलेल्या जागा लढण्याबाबत चर्चा झाली. युतीमध्ये योग्य सन्मान देण्यात येईल, असे भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी रिपाइं नेते व पदाधिकाऱ्यांना सांगितले. रिपाइंने समाधानकारक जागा मिळाव्यात, अशी मागणी केली. ज्या प्रभागात प्राबल्य आहे, तेथे उमेदवार देण्यास तयारी दाखविली. महायुतीमध्येच मनपा निवडणुकीत विजय मिळवून महायुतीचा महापौर करू, असा विश्वास दोन्ही पक्षाने व्यक्त केला. या बैठकीस भाजपकडून किशोर शितोळे, निवडणूक प्रमुख समीर राजुरकर, प्रशांत देसरडा, किरण पाटील तसेच रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम, मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके, माजी उपमहापौर किशोर थोरात, शहर अध्यक्ष नागराज गायकवाड, बाळकृष्ण इंगळे हे उपस्थित होते.
भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या आजपासून मुलाखती....
भाजपकडून महानगरपालिका निवडणुकीकरिता इच्छुक उमेदवारांच्या प्रभाग निहाय मुलाखती गुरुवार (दि.१८) पासून सुरू होणार आहेत, असे शितोळे यांनी सांगितले. गुरूवारी प्रभाग क्रमांक १ ते १८ पर्यंतच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. १९ रोजी प्रभाग क्रमांक १९ ते २९ पर्यंतच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत.