एका शिवमंदिराला चक्क ‘रावणा’चे नाव! ‘रावणेश्वर’ची आख्यायिका काय? कोणत्या गावात आहे?
By प्रशांत तेलवाडकर | Updated: July 28, 2025 18:56 IST2025-07-28T18:53:49+5:302025-07-28T18:56:12+5:30
श्रावणी सोमवार विशेष : पुरातन शिवमंदिर ‘रावणेश्वर’ची आख्यायिका काय?

एका शिवमंदिराला चक्क ‘रावणा’चे नाव! ‘रावणेश्वर’ची आख्यायिका काय? कोणत्या गावात आहे?
छत्रपती संभाजीनगर : लंकाधिपती ‘रावण’ हा केवळ एक पराक्रमी योद्धाच नव्हता, तर तो भगवान शंकराचा अतिशय निष्ठावान भक्त होता, याचा आपल्याला रामायणात अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो; पण तुमचे लक्ष वेधून घेईल अशी खास गोष्ट म्हणजे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेले एक पुरातन शिवमंदिर, जे ‘रावणेश्वर’ या नावाने ओळखले जाते.
मंदिर कुठे आहे?
वैजापूर तालुक्यातील देवगाव-रंगारी मार्गावर ‘शिवूर’ या गावात हे रावणेश्वर महादेवाचे मंदिर आहे. शहरापासून अवघ्या ५७ किलोमीटरवर हे गाव आहे.
आख्यायिका काय सांगते?
रामायण काळात शिवूर हे जंगलाने वेढलेले ठिकाण होते. येथे रावणाने शिव वरदानासाठी कठोर तपस्या केली. मात्र, भगवान शंकर प्रसन्न झाले नाहीत. तेव्हा रावणाने आपली नऊ मुंडकी अर्पण केली. दहावे मुंडके कापण्याच्या तयारीत असतानाच शंकर प्रकट झाले. त्यावेळी रावणाने भगवान शंकराला विनंती केली की, “तुमचं हे रूप माझ्या नावानं ओळखलं जावं.” भगवान शंकरांनी तथास्तू म्हटले. त्यावेळी या जागेवर शिवपिंडीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी तब्बल ८८ हजार ऋषी बोलावले गेले. मात्र, कोणीही मंत्र म्हणण्यास तयार नव्हते. अखेर खुद्द ब्रह्मदेवांनी मंत्रोच्चार केले आणि येथे शिवपिंडीची प्राणप्रतिष्ठा झाली. आजही ही शिवपिंड ‘रावणेश्वर’ म्हणून पुजली जाते. संत बहिणाबाईंच्या अभंगातही याचा उल्लेख सापडतो.
-बाळासाहेब मुळे, पुजारी
नागरशैलीतील वास्तुशिल्प
१) मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडी असून उंच कळस लक्षवेधक आहे.
२) मंदिरावरील कोरीवशिल्पे पाहता पाहता डोळ्यांचे पारणे फिटते.
३) पूर्वाभिमुख गर्भगृह हे संपूर्ण बंदिस्त आहे. शिवपिंडीचा आकार मोठा आहे.
४) प्रवेशद्वारात गणेश व कालभैरवाच्या मूर्ती आहेत. चौकटीवर दरबारात विराजमान शंकर-पार्वतीचे दृश्य कोरलेले आहे.
‘रावणेश्वर’ नावाची अन्य मंदिरे कुठे आहेत?
१) शिवूर, छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र)
२) रावणगाव, पुणे-दौंड मार्गावर (महाराष्ट्र)
३) कोल्हापूर (महाराष्ट्र)
४) रावणेश्वर मंदिर, बैद्यनाथ धाम-देवघर (झारखंड)
५) मंडावरग्राम (मध्य प्रदेश)
महाशिवरात्रीला मोठा उत्सव
रावणेश्वर मंदिरात महाशिवरात्री, श्रावणी सोमवार, नागपंचमी हे सण अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहात साजरे होतात. पंचक्रोशीतील गावांमधून हजारो भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात.
-अशोक गुरव, मंदिराचे गुरव