मुकुंदवाडी रेल्वेस्थानकात बसलेल्या प्रवाशाला भरदिवसा लुटले
By राम शिनगारे | Updated: April 27, 2023 17:30 IST2023-04-27T17:29:02+5:302023-04-27T17:30:14+5:30
या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मुकुंदवाडी रेल्वेस्थानकात बसलेल्या प्रवाशाला भरदिवसा लुटले
छत्रपती संभाजीनगर : रेल्वेने जाण्यासाठी स्थानकावर पोहचलेल्या प्रवाशाच्या खिशातील साडेतीन हजार रुपये बळजबरीने काढून घेतल्याचा प्रकार २५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनवर घडला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आरोपी गज्या मकळे (रा. ५६ नं.गेट, मुकुंदवाडी) याच्या विरोधात लुटमारीचा गुन्हा नोंदविण्यात आला.
फिर्यादी सागर बडिया (रा. संजपुरवाडी, ता. वैजापुर) हा शेतकरी युवक गावाकडे जाण्यासाठी मुकुंदवाडी रेल्वेस्थानकात आला होता. हातातील सामान ठेवून तो बाकड्यावर बसलेला होता. तेव्हा आरोपी गज्या मकळे हा त्याठिकाणी आला. त्याने सागरला मारहाण करीत त्याच्या खिशातील ३ हजार ३५० रुपये हिसकावून पोबारा केला. या घटनेमुळे घाबरलेल्या सागरने पुंडलिकनगर पोलिस ठाणे गाठले. त्याठिकणी गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास निरीक्षक राजश्री आडे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक शेषराव खटाणे करीत आहेत. आरोपी गज्या मकळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांनी दिली.