आरामदायक प्रवासासाठी नवा सोबती; एसटीच्या ताफ्यात देखण्या रुपातील हिरकणी बस दाखल
By संतोष हिरेमठ | Updated: June 7, 2023 16:21 IST2023-06-07T16:20:13+5:302023-06-07T16:21:48+5:30
१९८२ पासून एसटी महामंडळाची हिरकणी बससेवा सुरू झाली.

आरामदायक प्रवासासाठी नवा सोबती; एसटीच्या ताफ्यात देखण्या रुपातील हिरकणी बस दाखल
छत्रपती संभाजीनगर : शिवशाही बस आली आणि लाल बसनंतर आरामदायक प्रवासासाठी पसंतीस उतरलेली हिरकणी बस (सेमी लक्झरी) रस्त्यावरून गायबच झाली; परंतु एसटी महामंडळाच्या ताफ्यात पुन्हा एकदा हिरकणी बस, तीही नव्या रूपात लवकरच दाखल झाली आहे. मध्यवर्ती बसस्थानकात बुधवारी ५ नव्या हिरकणी दाखल झाल्या.
या निमआराम बसचे उद्घघाटन विभाग नियंत्रक सचिन क्षिरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी अमोल अहिरे, विधि अधिकारी अविनाश पाईकडे, आगार व्यवस्थापक (वरीष्ठ) अविनाश उद्धवराव साखरे, वाहतूक निरीक्षक संतोष नजन, नवनाथ बोडखे, योगेश सरोते, मच्छिंद्र बनकर, महेश कदम आदी उपस्थित होते. या निमआराम बस लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणार आहे.
१९८२ पासून एसटी महामंडळाची हिरकणी बससेवा सुरू झाली. चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत पूर्वी हिरकणी बसची बांधणी केली जात होती; परंतु गेल्या अनेक वर्षांत या बसची बांधणी झालेली नाही. त्यातच शिवशाही बसही दाखल झाल्या. त्यामुळे नव्या हिरकणी येणे बंदच झाले. मात्र, काही दिवसांपूर्वीच एसटी महामंडळाच्या पुण्यातील दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेत नव्या ‘हिरकणी’ बसने आकार घेण्यास सुरुवात केली. पाहता पाहता नव्या रूपातील हिरकणी बसने आकारही घेतला आहे.