आधुनिक शेतीची कास, अवघ्या सात मिनिटांत एका एकरवरील पिकावर औषध फवारणी
By बापू सोळुंके | Updated: September 23, 2023 17:34 IST2023-09-23T17:33:23+5:302023-09-23T17:34:08+5:30
औषध फवारणी ड्रोन खरेदीकरिता केंद्र सरकारकडून ४० टक्के अनुदान

आधुनिक शेतीची कास, अवघ्या सात मिनिटांत एका एकरवरील पिकावर औषध फवारणी
छत्रपती संभाजीनगर : एका एकरातील पिकावर कीटकनाशक फवारणीला दीड ते दोन तासांपेक्षा अधिक कालावधी लागतो. पिकांची वाढ होईल, तसा कीटकनाशक फवारणीचा वेळही वाढतो. आधुनिक तंत्रज्ञानाने ड्रोनद्वारे मात्र अवघ्या सात ते आठ मिनिटांत एका एकरातील पिकांवर औषध फवारणी शक्य झाली आहे. जिल्ह्यातील पहिले कीटकनाशक फवारणी करणारे ड्रोन कोनेवाडी येथील शेतकरी उत्पादक कंपनीने खरेदी केले आहे. या ड्रोन खरेदीसाठी शासनाने पोक्रा योजनेअंतर्गत ४० टक्के अनुदानही दिले.
पाठीवर १० ते २० लिटरची टाकी आणि पंप घेऊन पिकावर कीटकनाशक फवारणीचे काम खूप कष्टाचे असते. खबरदारी न घेतल्यास विषबाधेचाही धोका असतो. तर मोठ्या पिकांवर फवारणी करताना सर्पदंश आणि अन्य वन्यप्राण्यांपासूनही धोका असतो. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी ड्रोनद्वारे औषध फवारणी करावी, कृषी पदवीधर अथवा शेतकरी उत्पादक कंपनी ड्रोन खरेदी करू शकते. या निर्णयानुसार कोनेवाडी येथील शेतकरी उत्पादक कंपनीने जिल्ह्यातील पहिले कृषी ड्रोन चेन्नईली गरुडा कंपनीकडून खरेदी केले. १० लाख ८० हजार रुपयांच्या या ड्रोनसाठी शासनाने ४० टक्के अनुदान मंजूर केले.
शेतकरी उत्पादक कंपनीचे चेअरमन विलास भेरे यांनी सांगितले की, पिकावर कीटकनाशक फवारणी करण्याचे काम शेतकऱ्यांसाठी खूप कष्टदायक आणि धोकादायक असते. गुडघ्यापेक्षा अधिक उंच पिकांची वाढ झालेल्या शेतात सरपटणारे विषारी साप आणि विंचू दिसत नाही. या प्राण्यांकडून दंश होण्याचा धोका अधिक असतो. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन आमच्या कंपनीने ड्रोन खरेदी केले आहे. १० लिटर पाणी वाहून नेण्याची क्षमता या ड्रोनची आहे. संगणकीय प्रणाली आणि गुगल मॅपशी कनेक्ट करून जेवढ्या क्षेत्रावर कीटकनाशक फवारणी करायची आहे, त्या क्षेत्राबाबत ड्रोनला निर्देश द्यावे लागतात. एका एकरातील कोणत्याही पिकावर ७ ते ८ मिनिटांत हे ड्रोन औषध फवारणीचे काम पूर्ण करते.
नागरी उड्डयन मंत्रालयाची परवानगी आवश्यक
ड्रोन उडविणाऱ्या व्यक्तीने अधिकृत प्रशिक्षण घेणे गरजचे आहे. शिवाय नागरी उड्डयन मंत्रालयाच्या स्थानिक अधिकाऱ्याकडून रीतसर परवानगी घ्यावी लागते. त्याशिवाय कोणीही ड्रोन उडवू शकत नाही.