गंगापुरात टँकरचे सील तोडून 'गॅसचोरीचा खेळ' मोठे रॅकेट उघड, १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 15:20 IST2026-04-04T15:19:54+5:302026-04-04T15:20:04+5:30
चालक, मालक आणि स्थानिक सूत्रधार यांच्या संगनमताने काळाबाजार

गंगापुरात टँकरचे सील तोडून 'गॅसचोरीचा खेळ' मोठे रॅकेट उघड, १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त
वाळूज महानगर : गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवारात रात्री सुरू असलेल्या एलपीजी गॅस चोरीच्या धोकादायक रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. टँकरचे सील तोडून पाइपच्या साहाय्याने थेट सिलिंडरमध्ये गॅस भरून काळ्या बाजारात विक्री होत असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली. राज्यस्तरीय दक्षता पथक आणि पुरवठा विभागाच्या संयुक्त कारवाईत तब्बल १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त केला असून, चालक, मालक आणि स्थानिक सूत्रधार यांच्या संगनमताने हा काळाबाजार सुरू असल्याचे समोर आले आहे.
टँकरमधून पाइपद्वारे गॅसची चोरी
सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप विश्वनाथ शिंदे यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी रात्री सुमारे ९.४५ वाजता खोजेवाडी शिवार, वैजापूर रोड परिसरात हॉटेल साई यशच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत दोन एलपीजी टैंकर उभे करून त्यातून पाइपच्या साहाय्याने गॅस सिलिंडरमध्ये भरण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांना दिसून आले.
चालक आणि मालक यांचा गोरखधंदा
यापुढील तपासात टैंकर मालक श्रीहर छेदी यांनाही या अवैध प्रकाराची पूर्ण कल्पना असल्याचे उघड झाले आहे. म्हणजेच चालक, मालक सुरू असल्याचे आणि एजेंट यांच्या संगनमताने हे रॅकेट स्पष्ट झाले आहे.
एका टँकरमागे ६ सिलिंडर गॅस चोरले जातात
टैंकरमध्ये कंपनीकडून भरला जाणारा गॅस काही प्रमाणात अतिरिक्त असतो आणि हाच गॅस सौल तोडून काढला जात असल्याचे समोर आले. हा गॅस १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरून काळ्या बाजारात विक्रीसाठी जात होता. चौकशीत टैंकर चालकांनी कबुली देत सांगितले की, या कामासाठी त्यांना प्रति सिलिंडर सुमारे ६०० रुपये दिले जात होते. प्रत्येक फेरीत ५ ते ६ सिलिंडर भरले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.