धनगरपट्टी शिवारात बिबट्याने बकऱ्याचा फडशा पाडला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 16:41 IST2023-06-11T16:41:34+5:302023-06-11T16:41:44+5:30
मागील आठवड्यापासून दररोज परिसरात बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना होत आहे.

धनगरपट्टी शिवारात बिबट्याने बकऱ्याचा फडशा पाडला...
कायगाव : अगरवाडगाव परिसरातील धनगरपट्टी शिवारात शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता बिबट्याने दोन बकऱ्यांचा फडशा पाडला. गेल्या काही दिवसांपासून अगरवाडगाव, भिवधानोरा, धनगरपट्टी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून दररोज बिबट्या शेतकऱ्यांना दर्शन देत असून शेतकऱ्यांत घबराट पसरली आहे.
धनगरपट्टी येथील दिलीप सुखधान यांच्या शेतवस्तीवर शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता बिबट्या आला. दिलीप सुखधान यांच्या डोळ्यासमोर त्याने दोन बकऱ्यावर हल्ला केला. क्षणात त्याने दोन्ही बकऱ्यांचा फडशा पाडला, आणि त्या वस्तीवरून पळ काढला. मागील आठवड्यापासून दररोज परिसरात बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना होत आहे.
बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी येथे पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. यापूर्वीच्या घटना लक्षात घेता या भागात बिबट्याचा सदैव वावर असल्याचे सिद्ध झाले आहे. शनिवारी रात्री अनेक शेतकऱ्यांनी बिबट्याला जवळून पाहिले. काही शेतकऱ्यांनी त्याचे मोबाईलवर व्हिडीओ काढले. सकाळी वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पुढाकार घेण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.