‘भ्रष्टाचाराचा नमुना’; सक्त मजुरीऐवजी छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर प्रवासाची शिक्षा द्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 19:13 IST2025-10-27T19:11:41+5:302025-10-27T19:13:36+5:30
छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर रस्त्याच्या दुरवस्थेवरून सोशल मीडियात संतप्त प्रतिक्रिया

‘भ्रष्टाचाराचा नमुना’; सक्त मजुरीऐवजी छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर प्रवासाची शिक्षा द्या!
छत्रपती संभाजीनगर : ‘इथून पुढे जबरी गुन्ह्यात शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना सक्तमजुरीऐवजी रोज छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर असा प्रवास जाऊन-येऊन करण्याची शिक्षा सुनावणार आहेत जज्जसाब’ ही पोस्ट आहे एका सुजाण संभाजीनगरकराची, सकाळी ६ वा. पुण्याला जाण्यासाठी निघणाऱ्या अन् ३ वा. पोहोचणाऱ्या बेजार नागरिकाची. खड्ड्यांनी खिळखिळ्या झालेल्या शरीराला सांभाळत अनेकांनी सोशल मीडियावर संतापयुक्त नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी याला ‘भ्रष्टाचाराचा उत्तम नमुना’ म्हटलेय.
छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर मार्गाची अवस्था पाहिल्यास रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता; असे म्हणण्याची वेळ आली आहे. ज्या प्रवासाला पूर्वी ४ तास लागत होते, त्याठिकाणी दुप्पट ६ ते ६ तास लागत आहेत. याविरोधात आता शहरातील नागरिकांसह संपूर्ण राज्यातूनच नेटकऱ्यांनी टीकास्त्र डागले आहे.
या रस्त्यावरून प्रवास केल्यानंतर एकाने पोस्ट करत म्हटलेय की, ‘परवा या महाभयानक मृत्यूचा सापळा असणाऱ्या महाभिकार, महागलिच्छ मार्गावरून जाण्याचा योग आला. अहिल्यानगर ते संभाजीनगर ४.५ तास व परत येताना ४.५ तास लागले. खड्ड्यात थोडा रस्ता शिल्लक आहे’. तर दुसऱ्या एकाने म्हटले ‘देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना या मार्गावरून प्रवास करण्याची संधी लोकप्रतिनिधींनी दिली पाहिजे. म्हणजे त्यांना समजेल की, नक्की पैसे कुठे जात आहेत.’
हा पाणंद रस्ता?
नेटकरी एवढ्यावरच थांबले नाहीत तर या मार्गाचे व्हिडीओ, रील्स, फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
‘हा महामार्ग नाही, पाणंद रस्ता आहे. भ्रष्टाचार काय असतो याचा उत्तम नमुना आहे’ असे म्हणत एकाने सरकारच्या वर्मावर बोट ठेवले आहे. विनोदी शैलीत ‘इंग्रज आणखी काही काळ येथे राहिले असते तर छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर अशी विमानसेवा त्यांनी नक्कीच सुरू केली असती.’
पृथ्वीवरचा स्वर्ग
'या रस्त्यावर, या खड्ड्यावर शतदा प्रेम करावे' असा सल्ला काही नेटकरी देताना दिसत आहेत. इन्स्टाग्रामवर इन्फ्लुएन्सर्सनी या रस्त्याचे व्हिडीओ शेअर करत ‘या सुंदर रस्त्याच्या प्रेमात पडलोय’ अशी कॅप्शन दिली आहे. आणखी एकाने या रस्त्याला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हटले आहे.