सहा रुपयाची नशेची गोळी १०० रुपयांना विक्री; देवाणघेवाण करणारे चौघे एनडीपीएसच्या ताब्यात
By राम शिनगारे | Updated: September 15, 2022 18:00 IST2022-09-15T18:00:31+5:302022-09-15T18:00:54+5:30
या चौघांच्या विरोधात जिन्सी ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदवला.

सहा रुपयाची नशेची गोळी १०० रुपयांना विक्री; देवाणघेवाण करणारे चौघे एनडीपीएसच्या ताब्यात
औरंगाबाद : काही महिन्यांपूर्वी सहजपणे मिळणाऱ्या नशेच्या गोळ्या विकणाऱ्यांवर कारवाईचा धडका सुरु केल्यामुळे अवैध गोळ्याचे दर प्रचंड महागले आहेत. नियमानुसार मेडिकलमध्ये मिळणारी ६ रुपयांची गोळी नशेच्या बाजारात तब्बल १०० रुपयांवर गेली आहे. एनडीपीएस पथकाने गोळ्या विकणारे आणि खाणाऱ्या चार जणांना बेड्या ठोकल्यानंतर आरोपींनी ही माहिती दिली. या आरोपींच्या विरोधात जिन्सी ठाण्यात गुन्हा नोंदविल्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
एनडीपीएस पथकाचे सहायक निरीक्षक हरेश्वर घुगे यांच्या पथकास संजयनगर, रेंगटीपुरा भागात नशेच्या गोळ्यांची चढ्या भावाने विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचुन हाशम पाशा चाऊस उर्फ मामे (रा. गल्ली नं.७, संजयनगर), इर्शाद सय्यद याकुब सय्यद उर्फ सलमान (रा. मॅकेनिक, जिन्सी), अब्दुल सलाम अब्दुल शकुर (रा. गल्ली नं. ३१, इंदिरानगर, बायजीपुरा) यांना पकडले. या तिघांनी शेख सलीम शेख करीम (रा. हिनानगर, चिकलठाणा) याच्याकडून गोळ्या खरेदी केल्याचे सांगितले. त्यानुसार शेख सलीम यासही पथकाने पकडले.
या चौघांच्या विरोधात जिन्सी ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदवला. ही कारवाई एसीपी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक आघाव, सपोनि घुगे, औषध निरीक्षक बळीराम मरेवाड, सहायक फौजदार नसीम खान, विशाल सोनवणे, महेश उगले, धर्मराज गायकवाड, सुरेश भिसे, प्रजक्ता वाघमारे, दत्ता दुभळकर यांच्या पथकाने केली.