मक्याच्या कणसांना कोंब फुटलेले पाहून उद्विग्न शेतकऱ्याने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 18:25 IST2025-11-01T18:21:28+5:302025-11-01T18:25:01+5:30
कन्नड तालुक्यातील शफेपूर येथील घटना

मक्याच्या कणसांना कोंब फुटलेले पाहून उद्विग्न शेतकऱ्याने संपवले जीवन
पिशोर : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले, मक्याच्या कणसांना कोंब फुटले. पीक आणि त्यावर केलेला खर्च वाया गेल्याने नैराश्यातून कन्नड तालुक्यातील शफेपूर येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी ११:३० वाजता उघडकीस आली. कृष्णा रावजी दवंगे (वय ४४), असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
कृष्णा दवंगे यांना पिशोर हद्दीलगत माळावर शफेपूर शिवारातील शेत गट क्र.१५६ मध्ये अडीच एकर शेती आहे. त्यात त्यांनी हात उसनवारी करून मक्याची लागवड केली होती. चांगल्या आलेल्या पिकावर अतिवृष्टीने संक्रांत ओढावली. सततच्या पावसाने मक्याच्या कणसांना कोंब फुटले. पिकांची परिस्थिती बघून दवंगे हे बेचैन झाले होते. पीक गेल्याने हात उसनवारी कशी फेडावी, कर्ज कसे कमी होणार, या विवंचनेत ते काही दिवसांपासून होते, असे नातेवाईकांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी कृष्णा दवंगे हे शेतात गेले आणि शेतशिवाराला अखेरची चक्कर मारली. यानंतर त्यांनी आंब्याच्या झाडाला गळफास घेत मृत्यूला कवटाळले. काही वेळाने शेजारी शेतकऱ्यांनी आंब्याला लटकत असलेला दवंगे यांचा मृतदेह पाहिला. त्यांनी नातेवाईकांना व पिशोर पोलिसांना कळविले. जमादार वसंत पाटील, विजय भोटकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
पिशोर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर स्वाती बनसोड, अमोल घोडके यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. दिवाळीत शेतकऱ्याचे दिवाळे निघाले असून, सरकार कुठलेच ठोस पाऊल उचलत नसल्याने शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणाचा तीव्र निषेध व्यक्त केला. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कृष्णा दवंगे यांच्यावर शफेपूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, चार भाऊ, भावजय असा परिवार आहे. पत्रकार बापू हरणकाळ यांचे ते भाऊजी होत.